महिलांनी उद्योजकीय दृष्टीकोन विकसित करावा – सुधाकर झळके
भंडारा, दि. 1 : बचतगटांच्या माध्यमातून राज्यात मोठी चळवळ उभी राहिली आहे. पांरपरिक व्यवसायाव्यतिरीक्त नवीन कल्पना व उद्योगाकडे महिलांनी वळले पाहिजे. महिलांनी स्वत:मध्ये उद्योजकीय दृष्टीकोन विकसित करण्याचे आवाहन सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी वरठी येथे केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास व रोजगारांच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये उपस्थित महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून केलेल्या कामांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमास कौशल्य विभागाच्या मीरा मांजरेकर, उमेदचे गौरव तुरकर, प्रभाग संघाचे महजबीब शेख, सचिव चेतना दाढी, कोषाध्यक्ष संगीता लांबट, प्रभाग समन्वयक मनिषा चंद्रीकापुरे उपस्थित होते. या कार्यक्रमास बचतगटाच्या 300 सदस्य उपस्थित होत्या.