५० वर्षाची विजयी परंपरा कायम राहिल : सुधीर मुनगंटीवार
संदीप जोशी यांचे नामांकन अर्ज दाखल : ना.नितीन गडकरी यांनी दिला आशीर्वाद
नागपूर– नागपूर पदवीधर मतदार संघ हा भाजपचा गड आहे. ज्यावेळी भारतीय जनता पक्षाची केंद्र आणि राज्यात कुठेही सत्ता नव्हती त्यावेळीही या मतदार संघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी झालेला आहे. मागील ५० वर्षामध्ये दिवंगत गंगाधरराव फडणवीस, पंडित बच्छराज व्यास यांच्यापासून ते पुढे ना. नितीन गडकरी, प्रा.अनिल सोले यांनी पदवीर मतदार संघात विजयाचा झेंडा लहरवत ठेवला. ही भाजपाच्या विजयाची परंपरा आहे, यात कधीही खंड पडणार नाही. नागपूर विभागातील मतदार सुज्ञ आणि सुशिक्षित आहेत. याच मतदारांनी ना.नितीन गडकरी यांची पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून एकदा बिनविरोध निवड केलेली आहे. विभागातील हे सुज्ञ, सुशिक्षित मतदार पुढेही भाजपालाच साथ देतील आणि ही निवडणूक जिंकून विजयाची परंपरा कायम राखतील, असा ठाम विश्वास राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
नागपूर पदवीधर मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांनी आज गुरूवारी (ता.१२) विभागीय आयुक्त कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रा.अनिल सोले, निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री ॲड.सुलेखा कुंभारे, भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, नागपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष डॉ.राजीव पोतदार, खासदार डॉ.विकास महात्मे, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आमदार गिरीश व्यास, शिक्षक आमदार नागो गाणार, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, उपमहापौर मनीषा कोठे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शहर अध्यक्ष शिवाणी दाणी, भाजपा प्रदेश सचिव तथा मनपा विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी महापौर नंदा जिचकार, नगरसेवक संजय बंगाले, प्रा.प्रमोद पेंडके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महापौर संदीप जोशी यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, राज्यातील सरकार हे महाविकास आघाडीचे नसून महाबिघाडीचे सरकार आहे. या सरकारकडून सुरूवातीपासूनच विदर्भावर अन्याय होत आला आहे. आता नागपूर कराराचा भंग करण्याइतपत या सरकारची मजल गेली आहे. नागपूर करारात हिवाळी अधिवेशन घेण्याचे दर्शविले असतानाही केवळ कोरोनाचे कारण दाखवून मुंबईला अधिवेशन घेतले जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर आल्यानंतर तिथे पाहणी करायला जाणाऱ्या, मोठी मदत जाहिर करणाऱ्या सरकारकडून विदर्भातील पुरावर ‘ब्र’ही निघाला नाही. विदर्भासोबत होत असलेल्या या सावत्र वागणुकीला उत्तर देण्याची संधी पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून आलेली आहे. नेहमीच अन्याय सहन करणाऱ्या विदर्भात यापुढे हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
पदवीधर, शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देणार : संदीप जोशी
विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्याकडे नामांकन अर्ज सादर केल्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पदवीधर मतदार संघाचा गड कायम राखण्याची भाजपाची परंपरा यावेळीही कायम राहिल यामध्ये कुठलीही शंका नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, यापूर्वीचे पदवीधर मतदार संघाचे आमदार प्रा.अनिल सोले यांच्यासह पक्षातील सर्वच मान्यवर नेते, पदाधिकारी यांच्यापासून ते सर्वसामान्य कार्यकर्ते हे सर्व सोबत असल्याने विजयाचा आत्मविश्वास आहे. भारतीय जनता पार्टीने एक सामान्य युवा मोर्चाचा कार्यकर्ता असलेल्या व्यक्तीला महापौर पदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्या जबाबदाऱ्या ज्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे स्वीकारल्या आणि पार पाडल्या त्याच निष्ठेने पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडेन हा विश्वास आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच विदर्भावर होत असलेला अन्याय आज सर्वांनाच दिसू लागला आहे. या अन्याविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची आपली भूमिका राहिल. इथले पदवीधर, शिक्षक, बेरोजगार या सर्वांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठीच कार्य केले जाईल, असेही संदीप जोशी यांनी सांगितले.
ना.नितीन गडकरींनी दिले आशीर्वाद
प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाउन महापौर संदीप जोशी यांनी भेट घेतली. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी शाल देउन संदीप जोशी यांचा सत्कार केला आणि विजयासाठी आशीर्वाद दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चारदा पदवीधरांचे प्रतिनिधित्व करून राज्यात नवा आदर्श ठेवला आहे. त्यांनी महापौर संदीप जोशी यांच्या आजपर्यंतच्या कार्याची प्रसंशा करीत पुढील निवडणूक जिंकण्यासाठी आशीर्वाद दिले. यापूर्वी महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतले, वडील दिवंगत दिवाकरराव जोशी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून संदीप जोशी यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
अर्ज सादर करण्यापूर्वी बाबासाहेबांना अभिवादन
पदवीर मतदार संघ निवडणुकीचा नामांकन अर्ज सादर करण्यापूर्वी महापौर संदीप जोशी यांनी संविधान चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून नमन केले. यावेळी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांकडून विजयाचा जयजयकार करण्यात आला. प्रारंभी भाजपचे प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी महापौर संदीप जोशी यांना निळा दुपट्टा देत त्यांचे स्वागत केले.