जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न
चंद्रपूर, दि. 26 मार्च : जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च 2021 चे निमित्याने दिनांक 15 मार्च ते 31 मार्च 2021 पर्यंत क्षयरोग पंधरवाडा साजरा करण्यात येत असून जिल्हा स्तरावर क्षयरोग जनजागृती करण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत नुकतेच क्षयरोगावर आधारीत प्रश्नमंजूषा कार्यक्रम सरस्वती विद्यालय चंद्रपूर, छोटुभाई पटेल हायस्कूल चंद्रपूर ,ज्युबली हायस्कूल चंद्रूपर, येथे घेण्यात आले .
जागतिक क्षयरोग दिनानिमित्य जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.गोवर्धन दूधे, चंद्रपूर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सौरभ राजुरकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यावरांच्या हस्ते डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना मास्क वाटप करुन क्षयरोगाची शपथ देण्यात आली.
यावेळी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सौरभ राजुरकरव डॉ.गोवर्धन दूधे यांनी क्षयरोगावर मार्गदर्शन केले तसेच एमडीआर रुग्णाबाबत माहिती दिली. क्षयरोग कार्यक्रमावर उत्कृष्ट सहकार्य करणाऱ्या अशासकीय संस्था तसेच जागतिक क्षयरोग दिनानिमित्य आयोजित विविध स्पर्धामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथील सर्व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.