शेतक-यांना हवामान आधारीत कृषी सल्ला
चंद्रपूर दि. 24 मार्च : पुढील पाच दिवसात दिनांक 24 ते 28 मार्च 2021 रोजी चंद्रपूर जिल्हयात आंशिक ढगाळ हवामान राहून दिनांक 24 ते 25 मार्च रोजी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पिकांची काळजी घेण्यासाठी अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पुढील प्रमाणे सल्ला दिला आहे.
उन्हाळी भुईमूंग – वाढीची अवस्था
उन्हाळी भुईमूंगावरील तांबेरा आणि टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी टेंबुकोनॅझोल 25 टक्के डब्लू.जी. 500-750 ग्रॅम प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात (10-15 मि.ली. प्रति 10 लिटर पाणी) मिसळून फवारणी करावी.
फुलकिडयांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी 5फुलकिडे प्रति शेंडा गाठल्यावर क्विनालफॉस 25 टक्के प्रवाही 1400 मिली प्रति हेक्टरी 500 लिटर (28 मी.ली./10 लिटर पाणी) पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तापमानाची वाढ लक्षात घेता व जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास तीळ पिकास 10 ते 12 दिवसाच्या अंतराने ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
उन्हाळी धान –फुटवे अवस्था
उन्हाळी धान पिकाच्या रोवणीस 30 दिवसानंतर उरलेल्या 50 टक्के नत्राच्या मात्रेपैकी अर्धी मात्रा 25 टक्के (54किलो) युरीया प्रति हेक्टरी दयावे. खते दिल्यानंतर धान बांधीतील पाणी बांधून ठेवावे.
गादमाशी प्रवण क्षेत्रात रोवणीनंतर 30 दिवसांनी दाणेदार फोरेट 10 टक्के 10 किलो किंवा दाणेदार क्विनालफॉस 5 टक्के 5 किलो प्रति हेक्टरी बांधीमध्ये 5 ते 7 सें.मी. पाणी असतांना टाकावे.
पिकाची फुटवे फुटण्याच्या अवस्थेत 3 ते 5 सेंमी पाण्याची पातळी ठेवावी.
खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा जापोनिकम (ट्रायकोकार्ड) हे परोपजीवी किटक हेक्टरी 50000 अंडी या प्रमाणात दर 7 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 वेळा सोडावे. शेतात 5 टक्के किडग्रस्त फुटवे दिसताच क्लोरॅनट्रानीलीप्रोल 0.4 टक्के दाणेदार 10 कि.ग्रॅ. किंवा फीप्रोनिल 0.3 जी 25 कि.ग्रॅ. प्रती हेक्टरी बांधीमध्ये पाणी असतांना टाकावे.
गहु – पक्वता ते काढणी
गहू पिकाची काढणी करावी तसेच काढणी केलेल्या पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
उन्हाळी तीळ – वाढीची अवस्था
ढगाळ हवामानामुळे व वाढत्या आद्रतेमुळे तीळ पिकावर अनुजीवी बुरशीजन्य करपा आढळण्याची शक्यता आहे तरी त्याच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त औषध 20 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन 6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आवश्यकतेनुसार 2 ते 3 कोडपण्या/खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिण्याचे होईपर्यत शेतात तण होणार नाही याची काळजी घ्यावी.
जमिनीच्या मगदुराप्रमाणे तीळ पिकास 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
उन्हाळी भेंडी-फुल अवस्था-
सध्याच्या ढगाळ हवामानामुळे भेंडी पीकावरील मावा, तुडतुडे व फुलकीडे या रस शोषण करणा-या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी त्यांच्या नियंत्रणासाठी थायोमीथेझाम 25 टक्के विद्राव्य दाणेदार 2 ग्रॅम किंवा इमीडाक्लोप्रीड 2 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला पिके- वाढीची अवस्था
भाजीपाला पिकावरील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के एस.एल. 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 2-3 फवारण्या दर 15 दिवसाचे अंतराने फवारणी करावी.
वरील माहिती www.atmachandrapur.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे आवाहन कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फत करण्यात येत आहे.