मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता
क्रीडामंत्री सुनील केदार यांची मान्यता
मुंबई, दि, २३ : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याकरिता व त्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आग्रहाची भूमिका घेतली. त्यांनी केलेल्या मागणीला क्रीडामंत्री सुनील केदार यांनी २० कोटी १६ लक्ष रुपयाच्या कामास तत्वतः मान्यता दिली असून या कामाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा असे निर्देश क्रीडा आयुक्तांना दिले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा याबाबत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपुरी येथे हॉकी या खेळाचे राष्ट्रीय, राज्य खेळाडू असून बऱ्याच ठिकाणी स्पर्धा होत असतात. या खेळाचे राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या कृत्रिम मैदानावर होत असल्याने या भागातील खेळाडूंना अशा मैदानावर खेळण्याचा सराव होण्याच्या व अनुभव मिळण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे मैदान होणे अपेक्षित आहे. तालुका क्रीडा संकुल, ब्रम्हपुरी येथे सद्यस्थितीत असलेली जागा अद्यावत क्रीडा सुविधांच्या विस्तारीकरणा करिता अपूरी असल्याने तालुका क्रीडा संकुलाचे विस्तारीकरिता अंतर्गत मौजा बोंडेगांव येथील भुमापन क्रमांक ४०५ मधील ४.८५ हे. आर जागा खेळाचे मैदानाकरीता राखीव ठेवण्यात आलेली आहे. सदरच्या जागेवर अद्यावत क्रीडा सुविधा निर्मीती करणे शक्य होणार असून मौजा बोंडेगांव येथील नव्याने निर्माण करावयाच्या अद्यावत क्रीडा सुविधांचे रु. २०कोटी १६ लक्ष चे अंदाजपत्रक समितीचे वास्तुशिल्पतज्ञ यांनी तयार केलेले असून सदरचे अंदाजपत्रक संबंधित विभागास सादर करण्यात आले आहे. प्रस्ताव मंजूर करण्यासंदर्भात आज दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अद्ययावत क्रीडा संकुल बांधण्यासाठी नगरविकास विभागाने प्रस्तावित जागा क्रीडा विभागास तत्काळ हस्तांतरित केल्यास विविध सुविधा उपलब्ध करून देणे सुकर होईल अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.