अंकुर बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत हक्क दाखवावा
Ø अंकुरला दत्तक मुक्त घोषित करणार
चंद्रपूर,दि. 8 जून : महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, चंद्रपूर येथील अंकुर नावाच्या बालकाला दत्तक मुक्त घोषित करण्यात येणार असून त्याच्या संबंधित पालकांनी सात दिवसाचे आत बालकाबाबत आपला हक्क दाखवण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे एसएनसीयू वार्डात तीन दिवसाच्या बालकास दि. 2 नोव्हेंबर 2019 रोजी उपचाराकरिता दाखल केले होते. बालकाची प्रकृती बरी झाल्यानंतर दि. 11 नोव्हेंबर 2019 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. परंतु बालकाच्या आईने बालकाचे संगोपन करण्यास असमर्थ दर्शविल्यामुळे बालकल्याण समिती यांनी सदर बालकाचे नाव अंकुर नोंदवून बालकाला महिला विकास मंडळद्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह येथे दाखल केले.
या ठिकाणी साधावा संपर्क:
बालकाच्या आईने सात दिवसाच्या आत बालकल्याण समिती, चंद्रपूर, शासकीय मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह, डॉ.राजेंद्र आल्लुरवार बिल्डींग,सी-18, शास्त्रीनगर, किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष द्वारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जुना कलेक्टर बंगला, जिल्हा स्टेडियम जवळ, चंद्रपूर किंवा किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, डॉ. मुठाळ यांच्या जुन्या दवाखान्याजवळ, रामनगर चंद्रपूर येथे संपर्क साधावा.
तसेच सदर बालकाबाबत आपला हक्क दाखवावा अन्यथा बालकल्याण समिती, चंद्रपूर हे अंकुर बालकांला दत्तक मुक्त घोषित करेल आणि किलबिल संस्था दत्तक देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करेल.