कोविडमुळे पालक गमविलेल्या बालकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी गुल्हाने
Ø तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी 10 टक्के बेड राखीव
चंद्रपूर, दि. 5 जून : कोरोनाच्या माहामारीत अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमाविले आहेत. यात अनेक बालके सुद्धा अनाथ झाली आहेत. या बालकांची योग्य काळजी आणि संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा बालकांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
बालकांची काळजी व संरक्षणासाठी असलेल्या कृती दलाच्या कामकाजाचा आढावा घेतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, बालकल्याण समिती अध्यक्ष अॅड.वर्षा जामदार, महिला व बालकल्याण अधिकारी रमेश टेटे, जिल्हा परीक्षा अधिकारी श्री. दडमल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, स्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकर, चाईल्ड लाईनचे समन्वयक अमोल मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
कोविडमुळे पालक गमाविलेले बालके सध्या कुठे आहेत, याची माहिती त्वरीत घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, ही बालके त्यांच्या नातेवाईकांकडे की बालगृहात आहे, याची माहिती प्रशासनाला सादर करा. बालकांच्या पालकांचा मृत्यु कोविडमुळे झाला, याची रुग्णालयाकडून खात्री करून त्यांचा कोविड पॉजिटिव असल्याचा रिपोर्ट पाहा. मृत्यु प्रमाणपत्रामध्ये कोविड़चा उल्लेख नसला तरी अहवालाला पॉजिटिव असल्याचा रिपोर्ट जोडणे आवश्यक आहे. पालक गमविलेल्या बालकांना कोणकोणत्या योजनांचा लाभ देऊ शकतो, याचे योग्य नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी 10 टक्के बेड रुग्णालयात राखीव ठेवले जातील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना अपर जिल्हाधिकारी वरखेड़कर म्हणाल्या, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे असलेली बालकांची यादि प्रशासनाला त्वरीत पाठवा. तसेच सर्व तालुक्यांना पोर्टलवर माहिती भरण्याचा फॉरमेट वितरीत करा. उपलब्ध माहिती परिपूर्ण आहे की नाही, याची खात्री करा. यासंदर्भातील कोणतेही प्रकरण लाभापासुन वंचित राहता कामा नये. मुलांची मदत करणाऱ्या व्यक्ति, संस्थांना शासनाच्या निर्देशानुसार मार्गदर्शन करा. महानगरपालिका क्षेत्रातील बालकांची यादी वेगळी ठेवा, जेणेकरून त्यांना शहरी भागातील योजनांचा लाभ मिळू शकेल, असे त्या म्हणाल्या.
सध्यास्थितीत कोविडमुळे पालक गमावलेल्या 64 बालकांची यादी प्राप्त झाली आहे. यात 0 ते 6 वयोगटातील 19 बालके, 6 ते 18 वयोगटातील 42 बालके आणि 18 वर्षा वरील 3 बालकांचा समावेश आहे. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांमध्ये चंद्रपूर येथील दोन, चिमूर तालुक्यातील दोन आणि सावली तालुक्यातील एक बालक आहे. प्रतीपालक किंवा प्रायोजक तत्त्वावर बालकांना मदत करणाऱ्या व्यक्ति किंवा संस्थानी महिला व बालविकास विभागासोबत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.