मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणाचा युवक-युवतींना लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे
Ø आरोग्य विषयक पदांचे मिळणार मोफत प्रशिक्षण
चंद्रपूर, दि.1 जून : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरीता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या चंद्रपूर जिल्हातील युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडिकल व नर्सिग डोमेस्टिक वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करण्यात येत आहे. याकरीता शासनातर्फे मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून सदर प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. याकरीता जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहाय्यक आयुक्त, भैय्याजी येरमे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, निवासी आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत कन्नाके, तसेच खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर्स प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत सर्व शासकिय रुग्णालये व खाजगी रुग्णालये (२० पेक्षा अधिक बेड असलेले) वैद्यकीय शिक्षण संस्था यांची ग्रीन चॅनलद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था (विटीआय) म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ३.० या अंतर्गत व्हीटीआय इमर्जन्सी मेडिकल, तंत्रज्ञ, जनरल ड्युटी असिस्टंट (जीडीए), जीडीए अॅडव्हान्स, गृह आरोग्य सहाय्यक, वैद्यकीय उपकरणे तंत्रज्ञान सहाय्यक, Phlebotamist या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. राज्यशासनातर्फे ३६ अभ्यासक्रमामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येणार असून वैद्यकिय सुविधांची ने-आण करण्यासाठी वाहन चालक व अॅम्बुलन्स वाहनचालक या पदाचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणा-या सर्व प्रशिक्षणार्थीना किमान ६ महिने शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असेल. उमेदवारांना सदर प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून याद्वारे जिल्हयामध्ये कोरोना योद्धयांची मोठी साखळी निर्माण करण्यास मदत होत आहे.