संबंधित विभागांनी मान्सूनपूर्व करावयाच्या कामांची तातडीने अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
संबंधित विभागांना मान्सूनपूर्व आराखडा तयार करण्याचे दिले निर्देश
पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचना
चंद्रपूर दि.17 मे : जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीचे आकलन करून कोरोना विषाणू व पाउस या दोन्हीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीमध्ये सर्व विभागांनी एकत्रितपणे दोन्हींचे नियोजन करतांना समन्वयाने काम करावे तसेच तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी संबंधित विभागाला दिल्यात.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली विस कलमी सभागृहात झूम मीटिंगद्वारे संबंधित तालुक्याचे तहसीलदार व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत आढावा घेतला. यावेळी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, पावसाळ्यामध्ये येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर झाडे उन्मळून पडतात. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व नॅशनल हायवे अथोरिटीनी याबाबत दक्षता घ्यावी, मुख्य रस्त्यावरून ऑक्सीजन सिलेंडर वाहतूक करणारे टँकर यांना अडथळा निर्माण होणार नाही याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
तसेच वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये,तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित पूर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनीने टीम तयार करून ठेवावी. रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण असल्याने रुग्णालयातील वीज पुरवठा अबाधित रहावा त्यासाठी रुग्णालयाने बॅकअप इलेक्ट्रिकल्स, जनरेटर यांची पूर्तता करून ठेवावी.
पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी पावसाळ्यापूर्वीच करून घेत गळती बाबत कार्यवाही करावी. धरणाच्या खालील बाजूस असलेल्या तसेच पुरामुळे बाधित होणाऱ्या संभाव्य गावांची यादी तयार करून आपत्ती व्यवस्थापन कक्षात सादर करावी.
संबंधित विभागाचे वर्ग-1 चे अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करावे. नोडल अधिकारी यांचे नाव, पदनाम, दुरध्वनी क्रमांक, निवासी/कार्यालयीन व मोबाईल क्रमांक तात्काळ जिल्हा प्रशासनास व जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास सादर करावी. असेही ते म्हणाले.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्राने इरई धरणाचे गेट उघडते वेळी इरई नदीचे काठावरील गावांमध्ये तसेच शहरातील भागांमध्ये सायरन द्वारे नागरीकांना अलर्ट करण्याची यंत्रणा उभारण्यात यावी. शक्यतो रात्री पाणी सोडण्यात येऊ नये. इरई धरणाचे गेट उघडते वेळी पर्यायी विद्युत पुरवठा व्यवस्था जसे जनरेटर इंधनासह उपलब्ध ठेवावेत. तसेच नदीकाठच्या गावांना पाणी सोडत असल्याची पुर्वसूचना देण्यात यावी. इरई धरणातील पाणी सोडण्याबाबतची पुर्वसूचना जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, आयुक्त महानगरपालिका व तहसिलदार, चंद्रपूर यांना देण्यात यावी.
सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जिल्ह्यातील धोकादायक पुलांची पाहणी करून घ्यावी, पुराच्या पाण्याखाली जाणारे पुल निश्चित करून पूराचे वेळी पूलावरून वाहतुक होणार नाही याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच त्याबाबतचा अहवाल व पुलांची यादी जिल्हा प्रशासनास सादर करावी. त्यासोबतच किती गावे पाण्याखाली जातात, किती गावाचा संपर्क तुटतो याची माहिती तसेच राज्य महामार्गाचा कोणत्या ठिकाणी संपर्क तुटतो यांची यादी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व जिल्हा प्रशासनास सादर करावी. रस्त्यावर रात्री अपघात होऊ नये याकरीता रेडियम साईन बोर्ड रिफलेक्टर इत्यादी साधनांचा वापर करावा.
जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आपत्तीच्या काळामध्ये अॅम्बुलन्सचा आराखडा तयार करणे. आपात्कालीन अॅम्बुलन्सचा ट्रोल फ्री क्रमांक कार्यान्वित करणे, ॲम्बुलन्स गाड्यांची तपासणी करून घ्यावी. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये साथीच्या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून उपाययोजना करावी. तसेच नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास आरोग्य विभागास पुरेसा औषधी साठा, उपलब्ध करून ठेवण्यात यावा. असेही ते म्हणाले.
महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. शहरी भागात नदीलगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरत असलेली ठिकाणी निश्चित करणे, जेणेकरून त्या भागात राहणा-या लोकांच्या स्थलांतराचा आराखडा तयार करणे सोपे होईल. पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह झाडे उन्मळुन पडून मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून धोकादायक वृक्षाची छाटणी करावी.
पालिकेच्या हद्दीतील सर्व जुन्या इमारतींचे/वाड्यांचे बांधकाम तपासणी पावसाळयापुर्वी करून घेण्यात यावी. महानगरपालिकेच्या, नगरपरिषद/पंचायत हद्दीमध्ये झालेल्या आपत्तीजन्य घटनांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी. नदीपात्रालगत वस्त्यांचा व इतर धोक्यांच्या ठिकाणांचा माहिती घेऊन योजना ठरवावी.
तसेच यावर्षी पावसाळ्यात डेंग्यु, मलेरिया सोबतच कोरोना या आजाराशी लढावे लागणार आहे. त्यामुळे महानगर पालिका , आरोग्य विभाग यांना पावसाच्या कालावधीमध्ये साथरोग, कोरोना या पार्श्वभूमीवर स्वच्छता व आरोग्य या बाबीसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात यावी.
यासोबतच सर्व संबंधित विभागांनी मान्सूनपूर्व करावयाच्या कामाची तातडीने अंमलबजावणी करावी. तालुकास्तरीय व ग्राम स्तरीय समितीच्या मान्सुनपूर्व बैठका घेण्यात याव्यात. अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी संबंधित विभागाला दिल्यात.
झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतांना तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून घ्यावा व तो जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा. मान्सूनपूर्व तयारी करतांना रस्त्याची पाहणी करून घ्यावी, अन्नधान्याचा साठा उपलब्ध करून ठेवावा, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीत अलर्ट राहावे व मुख्यालय सोडू नये असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांनी मान्सूनच्या काळात करावयाच्या उपाययोजनांची तसेच मान्सुनपूर्व कामांच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिली.