आवश्यक औषधी, त्यासंबंधी उपचार पद्धती व जनजागृतीच्या माध्यमातून ‘म्युकरमायकोसिस’ आजारावर मात करणे शक्य : विजय वडेट्टीवार
कोविड-19 व म्युकरमायकोसिस या आजारविषयक आढावा बैठक संपन्न
चंद्रपूर दि.15 मे : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे रेमडेसिविर प्रमाणेच म्युकरमायकोसिस या रोगासाठीचे इंजेक्शन व औषध पुरवठा त्वरीत उपलब्ध करून घ्यावा व त्या संबंधीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिलेत.
कोविड-19 व म्युकरमायकोसिस या आजारासंदर्भात आवश्यक औषधी व त्यासंबंधी उपचार पद्धती करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते,अधिष्ठाता डॉ. टेकाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
ज्या रुग्णाला मधुमेहाचा त्रास आहे व रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना हा आजार होत असल्याने, म्युकरमायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांचा पुरवठा व इंजेक्शन जिल्ह्यातील रुग्णालयांना सुरळीत होण्यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दूरध्वनीद्वारे मागणी केली.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, कोविड या आजारातून बाहेर पडल्यानंतर रुग्णांची शुगर वाढणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्यावी. यावर विशेष लक्ष दिल्यास या रोगावर मात करता येऊ शकेल. तसेच म्युकरमायकोसिस या रोगाच्या उपचारासाठी वेगळा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम तयार करण्यात येणार असून कोणत्याही व्यक्तीला तीव्र डोकेदुखी, डोळे दुखी, डोळ्यावर सूज येणे, नाक बंद होणे यासारखी लक्षणे आढळून आल्यास रुग्णाला त्वरित या कक्षाशी संपर्क साधता येईल. या रोगावर तातडीने उपचार व उपाययोजना तसेच नागरिकांमध्ये जनजागृती केल्यास या रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते असा विश्वासही ना. वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा कमी होताना दिसत आहे. प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना व कार्यवाही केल्याने रुग्ण संख्येत घट होताना दिसून येत आहे. तसेच मृत्युदर वाढत चालला आहे त्यासाठी अनेक कारणे समोर येत आहे. यासाठी आवश्यक त्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिलेल्या आहेत.
आयसीयू वार्डात भरती असलेला रुग्ण हा ऑक्सीजन मास्क लावला असल्याने बोलू शकत नाही. त्यामुळे आयसीयू मधील रुग्णांच्या बेड जवळ बेल लावण्यात यावी. रुग्णाला वेळेवर पाणी मिळाले पाहिजे यासाठी व्यवस्था करावी. तसेच नवीन रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झाल्यास इतर रुग्णांचे वापरलेले ऑक्सिजन मास्क बदलून घ्यावे. तसेच रात्रीच्या वेळी रुग्णांचे मास्क निघून जातात व ऑक्सिजन पुरवठा स्थगित होतो त्यामुळे या किरकोळ गोष्टींमुळे रुग्णाचा मृत्यू होउ शकतो यावर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी यावेळी दिल्या.