ब्रह्मपुरी येथे ऑक्सीजन प्लांट उभारण्यास मान्यता
तालुक्यात दोन महिन्यात आत 80 टक्के लसीकरण
पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांनी दिले निर्देश
चंद्रपूर दि. 29 एप्रिल: ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅनच्या व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करावे. तसेच येत्या दोन महिन्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील 80 टक्के नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेऊन काम करण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथील कोविड आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.
तालुक्यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनची कमी पडणार नाही याचेही नियोजन करण्यात येत आहे. ऑक्सिजन व रेमडिसिव्हर इंजेक्शन अभावी रुग्ण दगावणार नाही याची सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या.
ब्रम्हपुरी येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित कोविड विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत आमदार अभिजित वंजारी, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस अध्यक्ष राऊत, सिंदेवाही तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोंढे, नगरपरिषद बांधकाम सभापती विलास विखार, नगरसेवक नितीन उराडे, तहसीलदार पवार, ठाणेदार इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खिलारे, उपविभागीय अभियंता कूचनकर, गट विकास अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात तसेच तालुक्याचे ठिकाणी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ऑक्सिजन कमी पडू लागल्याने चिंता वाढली आहे. ही ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सीजन प्लांट उभारणीस मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसात हे प्लांट उभे राहणार असून याठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन मिळणे सोयीचे होईल. तसेच तालुक्याच्या ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे व गरजू व आवश्यक रुग्णाला हे इंजेक्शन त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.
तालुकास्तरावर लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गावागावात जाऊन नागरिकांना लस देण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात यावे, नागरिकांनी लसीकरणा दरम्यान गर्दी करू नये व नियमांचे पालन करत लस टोचून घ्यावी,लस सुरक्षित व प्रभावी आहे. तसेच लस ही कोरोना विरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोरे येऊन लस टोचून घ्यावी असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी खेड येथील कोविड केअर सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून व्यवस्थेची माहिती घेतली. त्यानंतर शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय ब्रम्हपुरी येथिल कोविड केअर सेंटरला भेट देत करण्यात आलेल्या उपाययोजना, उपलब्ध ऑक्सिजन बेड, उपलब्ध औषध साठा याची माहिती जाणून घेतली.