सीसीसी बेडचे ऑक्सीजन बेड मध्ये रुपांतर करण्याचे पुर्वनियोजन करा
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कोरोना टास्क समितीला सूचना
चंद्रपूर, दि. 06 एप्रिल : कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर रूग्णांवर उपचारासाठी कोविड केअर सेंटरमधील (सीसीसी) सर्वसाधारण बेडचे गरजेनुसार ऑक्सीजन बेड मध्ये रुपांतर करण्याचे पुर्वनियोजन करून ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना आढावा बैठकीत जिल्हा कोरोना टास्क समितीला केल्या.
पालकमंत्री वडेट्टीवार यांनी कोरोना उपाययोजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात काल आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महानगरपालीकेचे आयुक्त राजेश मोहिते, वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साठे प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे गरजेचे असून नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्रांची संख्याही अधिक वाढविण्यात यावी. कोरोना रूग्णांवर उपचार करतांना इतर व्याधीग्रस्त रूग्णांकडेही दुर्लक्ष होऊ देवू नये असेही त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडविणे व रूग्णालयातील साफसफाई वेळच्या वेळी व्हावी म्हणून योग्य उपाययोजना करण्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री यांनी उपलब्ध औषध साठा, मनुष्यबळाची उपलब्धता, व्हेन्टीलेटर बेड, आयसीयु बेड व रिक्त बेड संख्या, तसेच लसीकरणाबाबत आढावा घेतला.
बैठकीला डॉ. सुधीर मेश्राम, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.