सर्वसामान्यांसाठी मोफत उपचार हेच प्राधान्य – डॉ. ओमप्रकाश शेटे
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचारांचे प्रमाण वाढवण्यावर भर, अपघात विमा व टोल फ्री नंबरचा वापर करण्याचे आवाहन
गडचिरोली, दि. 4 : “कोणताही रुग्ण आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू नये. आरोग्य ही मूलभूत गरज असून मोफत उपचार सर्वांपर्यंत पोहोचवणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे,” असे स्पष्ट मत आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी मांडले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला आमदार डॉ. मिलींद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे तसेच शासकीय व खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यात सध्या मोफत उपचाराचे प्रमाण ३० टक्क्यांवर असून ते किमान ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेने नव्या जोमाने कार्य सुरू करावे, असे आवाहन डॉ. शेटे यांनी केले.
रुग्णालयात उपचार घेताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी फक्त रुग्णाचे आयुष्मान कार्ड किंवा रेशन कार्ड पाहून तातडीने उपचार सुरू करावेत, नातेवाईकांचे कार्ड मागून उपचार नाकारणे टाळावे, असे त्यांनी बजावले.
अपघातग्रस्त रुग्णांसाठी ‘स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना’ उपयुक्त ठरते. अशा वेळी टोल फ्री क्रमांक 18002332200 चा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गडचिरोली जिल्ह्यातील योजनेची सद्यस्थिती डॉ. शिंदे व डॉ. किलनाके यांनी सादरीकरणाद्वारे मांडली. जुलै 2024 पासून ८८३ लाभार्थ्यांकडून ९०२ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील ८०० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. एकूण १ कोटी ७७ लाख ३६ हजार ७०० रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४४ हजार २९० आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली असून हे ४८ टक्के प्रमाण असल्याचे व राज्यात गडचिरोली जिल्हा चवथ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रमाण वाढवून १०० टक्के करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही नमूद केले.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. शेटे यांनी सांगितले की, गडचिरोलीतील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी माध्यमांनी देखील सहकार्य करावे. बैठकीदरम्यान खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी अंमलबजावणीतील अडचणी मांडल्या, त्यावर लवकरच योग्य उपाययोजना केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.