घरकुल बांधकामाकरीता आता क्रश सॅन्डचा वापर

घरकुल बांधकामाकरीता आता क्रश सॅन्डचा वापर

चंद्रपूर, दि. 3 एप्रिल : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व इतर घरकुलांची संख्या मोठी आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून गरीबांसाठी मोठया प्रमाणात घरकूले मंजूर करण्यात आली आहेत. परंतु सध्यास्थितीत वाळू उपलब्ध होण्यास अडचण असल्यामुळे वाळूला पर्याय म्हणुन क्रश सॅन्डचा वापर करणे हा उत्तम पर्याय होऊ शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकुलाच्या बांधकामाकरीता क्रश सॅन्डचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःच्या घराचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याकरीता जिल्हा परिषद प्रशासन पूर्ण प्रयत्नात आहे. काही वेळेस घरकूलाची कामे पूर्ण करण्यास विलंब होतो. त्यामुळे घरकुल बांधकामात येणा-या अडचणी दूर करण्याकरिता व लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याकरीता जिल्हा परिषदेतर्फे एकाच वेळी 30263 घरकुलाच्या भूमिपूजनाचा उपक्रम राबविण्यात आला. त्यात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सहभागी करून घेवून लाभार्थ्यांना येणा-या अडचणी समजून घेण्यात आल्या व लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

 

क्रश सॅन्ड ही (कृत्रिम वाळू) असून हा नैसर्गिक वाळू (नदीतील वाळू) ला पर्याय म्हणून विविध बांधकामाकरिता वापरली जाते. ही खड्यांमधील कठीण खडक (बेसॉल्ट) फोडून व मशीनव्दारे बारीक पावडर तयार केली जाते. अशा वाळूचा वापर काँक्रीट मिश्रण जसे की, रेती, सिमेंट किंवा सिमेंट खडी व पाणी यांचे सोबत मिश्रण करून मजबूत काँक्रीट तयार करण्याकरीता होते. ही सॅन्ड बीम/कॉलम स्लॅब व विट जुडाई यासारख्या बांधकामाकरिता उपयुक्त आहे. प्लॉस्टरींग व विट बांधकामासाठी नैसर्गिक वाळूच्या उत्खननामुळे नदी व पर्यावरणाला होणारे नुकसान टाळण्यासाठी क्रश सॅन्ड हा पर्याय म्हणून वापरला जातो. क्रश सॅन्डची मजबूती ही नैसर्गिक वाळू पेक्षा जास्त असल्याने क्रश सॅन्ड वापरण्याबाबतचा तांत्रिकदृष्ट्या सल्ला ही देण्यात येतो.

 

नैसर्गिक वाळूच्या तुलनेत क्रश सॅन्ड स्थानिक पातळीवर तयार होत असल्याने वाहतुक खर्च कमी असतो. तसेच पर्यावरणीय नुकसान कमी होते. क्रश सॅन्ड, बांधकामासाठी मजबूत, टिकाऊ व फायदेशीर पर्याय असून नैसर्गिक वाळुपेक्षा अनेक बाबतीत सरस आहे. सर्व गट विकास अधिका-यांच्या मार्फतीने सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी तसेच घरकुल लाभार्थी यांची कार्यशाळा घेऊन क्रश सॅन्ड वापरण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. त्याला घरकुल लाभार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. घरकुल लाभार्थ्यांनी वाळूऐवजी क्रश सॅन्डचा वापर करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे यांनी केले आहे.