मलेरिया नियंत्रणासाठी कार्यगट गठीत
गडचिरोली 02 :- गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या निर्णयाने डॉक्टर अभय बंग संस्थापक सर्च फाउंडेशन गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 14 सदस्यिय कार्य गट स्थापन करण्यात आला आहे या कार्य गटाची काल सर्च फाउंडेशन गडचिरोली येथे बैठक पार पडली.
या कार्य गटाचे अध्यक्ष डॉ अभय बंग संस्थापक सर्च फाउंडेशन गडचिरोली व सदस्य सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे आहेत.
कार्य गटाच्या बैठकीमध्ये जिल्ह्याकरिता आराखडा तयार करणे व तीन वर्षासाठी अंदाजपत्रक प्रस्तावित करणे, हिवताप निर्मूलनाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा गडचिरोली योजनेकरिता सल्ला घेणे, अंमलबजावणी प्रगतीचे पुनर्विलोकन करणे, अंतिम मूल्यांकन व अहवाला बद्दल सल्ला देणे यावर चर्चा झाली.
मलेरिया निर्मूलनासाठी अंमलबजावणी समिती स्थापित करण्यात आली आहे त्यामध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री आविश्यात पंडा, सदस्य सचिव जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पंकज हेमके राहतील, अंमलबजावणी समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके हे सदस्य राहतील.