सावित्रीबाई फुले शाळेतील 17 विद्यार्थी केंद्राच्या गुणवत्ता यादीत यशाची परंपरा कायम
चंद्रपूर 02 एप्रिल – चंद्रपूर महानगरपालिकेच्या पीएम श्री सावित्रीबाई फुले शाळेतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ( एनएमएमएस ) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 20 विद्यार्थ्यांपैकी 17 विद्यार्थी हे केंद्राच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. शहरातील एका शाळेतील सर्वात अधिक संख्येने या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मनपा शाळेने मिळविला आहे.
जातीनिहाय आरक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या अनेक कल्याणकारी शिष्यवृत्ती योजनांचा दरवर्षी लाभ मिळत असतो. परंतु ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशपातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रक्षेची जोपासना, तसेच त्यांचे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे.
प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे 8 वी ते 12 वी पर्यंत मुलांना देण्यात येते. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रति वर्षासाठी बारा हजार याप्रमाणे चार वर्षासाठी 48 हजार रुपये मिळत होते. आता यात एक वर्ष वाढल्याने त्यात 12 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच याआधी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दीड लाख रुपये होती. आता त्यात दोन लाखांनी वाढ झाल्याने साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना देखील ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येत आहे.
मनपा शाळेतील गुणवंतांमध्ये प्रज्वल निलेश वैरागडे,भूमिका पवन निखाडे,केसीकौर केवलसिंग भोयर,सोहम राजू सोरते,संस्कृती नितीन घोटेकर,श्रेयस सुनील दुर्योधन ,आरोषी संजय देवघरे,शौर्य प्रशांत आंबटकर,रिंपा विश्वजीत मजुमदार,माही नागनाथ निमगडे,वैष्णवी प्रशांत कंदीकुरवार,गणेश अनिल ठाकरे,वंश सचिन पवार,समीक्ष कैलाश गोदरवार,गौरव भारत नंदनवर,लोकेश ईश्वर जेंगठे,प्रशिल अमोल रामटेके या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आयुक्त विपिन पालीवाल यांच्या नेतृत्वात,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक नागेश नित,वर्ग शिक्षक जोगेश्वर मोहारे,विषय शिक्षक मंगेश अंबादे, सचिन रामटेके यांच्या प्रयत्नाने शाळेला यश प्राप्त झाले असुन सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.