सलग दुसऱ्या वर्षी मनपाला पुरस्कार 4 लक्ष रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर
चंद्रपूर 02 एप्रिल :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेला सलग दुसऱ्या वर्षीचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2024-25 चा पुरस्कार जाहीर झाला असुन या आधी काही दिवसांपूर्वीच मालमत्ता कराची नॅच प्रणाली यशस्वीरित्या राबविल्याबद्दल 2023-24 वर्षाकरीता महानगरपालिका गटात तिसरा पुरस्कार चंद्रपूर मनपाला मिळाला होता.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेले सौंदर्यीकरण अभियान, जलाशय व पाणीसाठे यांची स्वच्छता, शाळा इमारत नूतनीकरण, सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धा, रस्त्यांचे सुशोभिकरण, विविध शिल्प उभारणी इत्यादी विविध कार्यांची दखल राज्य शासनाने घेतली असुन 2024-25 च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेला सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा तृतीय क्रमांक व 4 लक्ष रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मनपाने राबविलेल्या सुंदर माझे उद्यान ” व ” सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धेत लोकसहभागाने मोठ्या प्रमाणात उद्याने व विविध भागांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्यात आले होते. जवळपास 3400 नागरिक यात प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरीत्या सहभागी झाले होते. विविध शिल्प व कारंजे चौक सौंदर्यीकरण अंतर्गत उभारण्यात आले. मनपाच्या 15 शाळा या भौतिक सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यात येऊन या शाळांना आयएसओ मानांकन सुद्धा मिळाले. विद्यार्थी नागरिक,स्वयंसेवी संस्था यांच्याशी जुळुन प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयाने विविध उपक्रम राबविण्यात आल्याने या विविध उपक्रमांची दखल राज्य शासनाद्वारे घेण्यात आली आहे
महानगरपालिका स्तरावरून थेट प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 यां दोन वर्षांत राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान राबविण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांचे विविध निकषांवर परीक्षक मंडळाकडून परीक्षण करून निकाल तयार करण्यात आला व बुधवारी शासन निर्णयाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.