वरोरा येथील विकासकामांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी Ø उपजिल्हा रुग्णालयाला भेट व रुग्णांची विचारपूस

वरोरा येथील विकासकामांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

Ø उपजिल्हा रुग्णालयाला भेट व रुग्णांची विचारपूस

चंद्रपूर, दि. 2 एप्रिल : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत क्षेत्रीय भेटीदरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वरोरा तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी देऊन कामांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे यांच्या टीमसोबत रुग्णालयाची पाहणी करून विविध रुग्णालयातील वॉर्ड , त्यातील यंत्र सामग्री, मेडीसिन उपलब्धता, टेलीमेडिसिन सुविधा कक्ष आदी सोयीसुविधांचा आढावा घेतला व रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर नगर परिषद वरोरा अंतर्गत येणाऱ्या सीव्हएज ट्रीटमेंट प्लांट व प्रस्तावित तलाव खोलीकरण कामाची पाहणी केली. न.प. मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांच्या पथकाने नियोजित कामाबाबत जिल्हाधिका-यांना माहिती दिली. तलाव खोलीकरण बाबत सामाजिक संघटनांचा सहभाग, त्यासाठी लागणारा सामाजिक दायित्व निधी व इतर योजनांमधील उपलब्ध पर्यायाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

तसेच वरोरा ते माढेंळी व पुढे यवतमाळकडे जाणा-या राज्य मार्ग विकास कामाची पाहणी केली. त्यानंतर मौजे भटाळा या गावात गडकिल्ले व स्मारक संवर्धन योजनेअंतर्गत पुरातत्त्व विभागाद्वारे संवर्धन करण्यात येणारा तलाव व महादेव मंदिर येथील कामाची पाहणी करून सदर कामाच्या विकासात येणारे समस्या जाणून घेतल्या. तसेच ग्रामपंचायत भटाळा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या पाणंद रस्त्याच्या मातीकामाची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

संपूर्ण भेटीदरम्यान वरोराचे उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी श्री. मुंडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. लोया, न.प. मुख्याधिकारी विशाखा शेळकी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्री प्रफुल्ल खुजे, नायब तहसीलदार श्री. काळे, नागपूर येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक मयुरेश खडके यांच्यासह मंडळ अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव, तलाठी आदी उपस्थित होते.