अवैध गर्भलिंग निदान केंद्राची माहीती द्या, 1 लाखाचे बक्षीस मिळवा

अवैध गर्भलिंग निदान केंद्राची माहीती द्या,
1 लाखाचे बक्षीस मिळवा
टोल फ्री क्रमांक व ‘आमची मुलगी’ वेबसाईटवर करता येते अवैध केंद्राची तक्रार

चंद्रपूर 1 एप्रिल – गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्राचा वापर करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणे,गर्भपात करणे कायदान्वये गुन्हा आहे. मात्र त्यानंतरही राज्यात अश्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता शासनाद्वारे कठोर पाऊले उचलण्यात येत असुन प्रसुतीपूर्व निदानतंत्र प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाच्या वतीने ‘आमची मुलगी’ ही वेबसाईट व टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून यावर अवैध सोनोग्राफी केंद्राची तक्रार करता येते. अशा सोनोग्राफी केंद्राची माहिती देणाऱ्या खबरी व्यक्तीस 1 लाख रुपयांचे बक्षीस शासनातर्फे व स्टिंग ऑपरेशनसाठी तयार होणाऱ्या गर्भवती महिलेस 1 लाख शासनातर्फे तर 25 हजारांचे बक्षीस चंद्रपूर मनपातर्फे देण्यात येते.
समाजात अजूनही भ्रूणहत्या करणाऱ्या प्रवृत्तीची कमी नाही. मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी होत आहे. परंतु त्यानंतरही सोनोग्राफी केंद्रात गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 चे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे असे कृत्य करण्याची जाहिरात करणाऱ्या व्यक्ती, पुस्तके, प्रकाशने, संपादक, वितरक आदींची माहिती आरोग्य विभागाच्या टोल फ्री क्र.18002334475 या क्रमांकावर नागरिकांनी नोंदवावी, असे आवाहन चंद्रपूर मनपा आरोग्य विभागाने केले आहे.
गर्भलिंग निवडीशी निगडीत सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर, दवाखाना किंवा प्रयोगशाळा यांच्या विषयी माहिती मिळाली, तर त्या विषयीच्या पुराव्यांसहित मनपा आरोग्य विभागास संपर्क करून तक्रार दाखल करावी. अवैध गर्भलिंग निदान केंद्राची माहीती पुराव्यासहित दिल्यास व माहीती खरी निघाल्यास व यासंदर्भात संबंधित डॉक्टर विरोधात न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतरच  तक्रारकर्त्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची नियमात तरतूद असुन अशी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते त्यामुळे न घाबरता गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहीती देण्याचे आवाहन चंद्रपुर मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

चंद्रपुर शहरात डीकॉय मोहीम –
अवैध गर्भलिंग निदान टाळण्यासाठी मनपा आरोग्य विभागातर्फे “डीकॉय” मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एका गर्भवती महिलेला संशयित केंद्रावर पाठवले जाते. जर ते केंद्र अवैध गर्भलिंग निदान करण्यास तयार झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाते.स्टिंग ऑपरेशनसाठी तयार होणाऱ्या गर्भवती महिलेचे नाव गुप्त ठेवले जाऊन संबंधित केसमध्ये पुढील कायदेशीर प्रक्रियेकरीता महिलेची उपस्थिती राहिल्यास व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास मदत झाल्यास प्रत्येक बनावट (डीकॉय) केसेसमधील उपस्थित डीकॉय महिलेला 1 लाख शासनातर्फे तर चंद्रपूर मनपातर्फे 25 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येते.

दंड आणि शिक्षा?
गर्भलिंग निदान अथवा गर्भपात केल्यास संबंधित व्यक्तींना 3 वर्षे कारावास व 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास ५ वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंड होऊ शकतो.गर्भलिंग सांगणे किंवा जाणून घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तसेच हा अजामिनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात आपसात संमतीने खटला मागे घेता येत नाही.
.
गर्भलिंग निदान कधी करता येते?
गर्भधारणेच्या साधारण 3 महिने पूर्ण झाल्यानंतर गर्भलिंग ओळखता येतो,परंतु गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा 2003 कायद्यान्वये गरोदरपणापूर्वी लिंग निवड करणे किंवा गरोदरपणात गर्भलिंग जाणून घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे.

सोनोग्राफी केंद्रांची तपासणी –
मनपा कार्यक्षेत्रात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येते. शहरात एकुण 74 सोनोग्राफी केंद्र व 43 वैद्यकीय गर्भपात केंद्रे आहेत. मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दर 3 महिन्यांनी या सर्व सोनोग्राफी केंद्र व वैद्यकीय गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी करण्यात येते.मागील काही वर्षात यासंबंधी एकही तक्रार आरोग्य विभागास प्राप्त झालेली नाही – डॉ. नयना उत्तरवार (वैद्यकीय आरोग्य अधिकारी,मनपा)   

अवैध केंद्राची माहिती कुठे द्याल? –
1. टोल फ्री क्र. 104
2. हेल्पलाईन क्र. 18002334475
3. www.amchimulgimaha.in
4. मनपा टोल फ्री क्रमांक 18002574010
5. व्हाट्सअप क्रमांक 8530006063