आयुक्तांनी केले नव्या रूपातील संकेतस्थळाचे लोकार्पण

आयुक्तांनी केले नव्या रूपातील संकेतस्थळाचे लोकार्पण

चंद्रपूर १ एप्रिल – चंद्रपूर महानगरपालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते कळ दाबुन करण्यात आले.मनपा संगणक विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले हे संकेतस्थळ सुरक्षित, सुगम्य, सुलभ असल्याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी बोलतांना आयुक्त म्हणाले की, मनपाच्या अधिकाधिक सेवा या ऑनलाईन पद्दतीने देण्यात येत असुन त्या अधिक लोकाभिमुख करण्यास प्रशासन कटिबद्ध आहे. चांदा सिटी हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातुन नागरीकांनी दाखल केलेल्या १२ हजारहुन अधिक तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तक्रारींचे निराकरण ही मोठी गोष्ट नसली तरी आपल्या तक्रारींना मनपा प्रतिसाद देते ही भावना नागरिकांमध्ये रुजली ही मोठी बाब आहे.

अनेक सेवा मनपाने सुरु केल्या आहेत ज्या मोठ्या महापालिकांमध्ये अजुनही सुरु झालेल्या नाही जसे व्हॉट्सअप चॅटबॉट.याद्वारे सुद्धा आपण विविध सेवा देत असतो. तंत्रज्ञान सतत वाढत जाणारे आहे त्यामुळे अद्ययावतीकरण होणे आवश्यक आहे. शासनाच्या 100 दिवसांचा कृती आराखड्यानुसार मनपाचे संकेतस्थळ हे अद्ययावत व वापरण्यास सोपे करण्यात आले आहे.

cmcchandrapur.com या नावाने सुरु झालेल्या या संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण करण्यात आले असुन मनपाच्या विविध सेवा जसे मालमत्ता कर,पाणी कर,जन्म-मृत्यु प्रमाणपत्र,व्यवसाय परवाना,विवाह नोंदणी,बांधकाम परवानगी,होर्डींग परवानगी,तक्रार निवारण प्रणाली,सेवा हमी कायदा,ना हरकत प्रमाणपत्र,पाळीव प्राणी परवानगी या सर्व सेवांचा लाभ ऑनलाईन पद्धतीने नागरीकांना घेता येणार आहे.मनपाचे सर्व विभाग त्यांचे अधिकारी वर्गाचीही माहीती यात देण्यात आली आहे.