गडचिरोली येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १५,६०,१९४/- रुपयांचा जप्त मुद्देमाल पोलीसांनी केला नष्ट
• एकूण ८७ गुन्ह्यांमधील मुद्देमाल करण्यात आला नष्ट
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही केली जात असते. त्याअनुसार विविध पोस्टे येथे दाखल गुन्ह्यांमध्ये जप्त मुद्देमाल हा नाशवंत असल्याने तसेच नवीन कारवाईदरम्यान देखील मुद्देमाल जप्त होत असल्याने जागे अभावी दीर्घकाळापासून प्रलंबित मुद्देमाल जतन करुन ठेवणे अडचणीचे ठरत असते. यावरुन पोस्टे गडचिरोली येथे दाखल एकुण ८७ गुन्हयांमधील महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल काल दिनांक २८/०३/२०२५ रोजी नष्ट करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे आहे की, मा. न्यायालय व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने काल दिनांक २८/०३/२०२५ रोजी पोस्टे गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. चंदन भगत व शु. के. चौधरी यांच्यासह पोस्टे गडचिरोली हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यांतील जप्त मुद्येमाल नष्ट केला. ज्यात १) देशी दारुच्या ९० मिली मापाच्या १४०२७ प्लॉस्टीक बॉटल, २) विदेशी दारुच्या २००० मिली मापाच्या ५५ प्लॉस्टीक बॉटल, ३) विदेशी दारुच्या ७५० मिली मापाच्या २९ काचेच्या बॉटल, ४) विदेशी दारुच्या ३७५ मिली मापाच्या ७१ काचेच्या बॉटल, ५) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या ७०९ काचेच्या बॉटल, ६) विदेशी दारुच्या ९० मिली मापाच्या ४९ काचेच्या बॉटल, ७) बियरच्या ६५० मिली मापाच्या ०९ काचेच्या बॉटल, ७) बियरच्या ५०० मिली मापाच्या २८७ टिनाचे कॅन याप्रमाणे एकुण १५,६०,१९४/- (अक्षरीः-पंधरा लाख साठ हजार एकशे चौऱ्यान्नऊ) रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जेसीबिच्या सहाय्याने १५ X १५ फुटाचा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाड जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लास्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला त्यानंतर काचेचा चुरा व प्लास्टीकच्या चेपलेल्या बॉटल जेसीबीच्या सहाय्याने खड्यात टाकून खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्देमालाची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोली येथील प्रभारी अधिकारी पोनि. रेवचंद सिंगनजुडे व पोहवा/चंद्रभान मडावी यांनी पार पाडली.