जागतीक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
शपथ घेऊन समानतेने जगण्याचा सल्ला
चंद्रपूर, दि. 1 : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून ‘मार्ग हक्काचा, सन्मानाचा’ या घोषवाक्यावर आधारीत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त विविध सामाजिक संस्था, महाविद्यालय यांच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर सोनारकर यांनी एडस् विरोधी शपथेचे वाचन केले.
एडस् विरोधी शपथ घेऊन रॅलीला सुरुवात करण्यात आली. सदर रॅली सामान्य रुग्णालयातून जटपुरा गेट मार्गे आझाद बगीचा परत जिल्हा सामान्य रुग्णालयात समाप्त करण्यात आली. रॅली मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, जिल्ह्यातील नामांकित सामाजिक संस्था रोटरी क्लबचे पदाधिकारी, आय.एम.ए. वैद्यकीय संघटनेचे पदाधिकारी, एनर्व्हील क्लब पदाधिकारी, शासकिय नर्सिंग कॉलेज, विश्वानंद नर्सिंग कॉलेज, प्रभादेवी नर्सिंग कॉलेज, वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज, अशोका नर्सिंग कॉलेज, नवजीवन नर्सिंग कॉलेज, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एआरटी केंद्राचे सर्व कर्मचारी, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था द्वारा अनुदानित स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रॅली दरम्यान एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध घोषवाक्य म्हणून व माहिती पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधित रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधा तसेच शासनाच्या योजना याविषयी माहिती दिली. तसेच एड्स प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणेने कार्य करावे, असे आवाहन केले. अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर म्हणाले की, शासनाच्या वतीने एड्स नियंत्रणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या आजाराबाबत भीती अथवा गैरसमज न बाळगता, समुपदेशन व उपचाराकरिता संबंधित रुग्णांनी आरोग्य चमूंना सहकार्य करावे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सूचना देऊन गरोदर माता व सामान्य नागरिकांना एचआयव्ही तपासणी करण्याची सुविधा, साहित्याची उपलब्धता आणखी प्रबळ करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एआरटीचे वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी यांनी केले. संचालन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी तर आभार जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर यांनी मानले. कार्यक्रमाला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, आय.एम.ए. सचिव डॉ. प्रवीण पंत, प्रशासकीय अधिकारी डॉ. किरण कानेरे, एआरटी चे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष आशिष काळे, एस.आर.एम.महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.देवेंद्र बोरकुटे, प्रा. संतोष आडे, सामान्य रुग्णालय चंद्रपूर अधीसेविका एम.एम. आत्राम, एआरटीचे वरीष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर, विहान प्रकल्पाचे जोसेफ डोमाला आदी उपस्थित होते.