निवडणूक कर्तव्‍यावर असणारे शिक्षक, कर्मचारीच मतदानापासून वंचित

निवडणूक कर्तव्‍यावर असणारे शिक्षक, कर्मचारीच मतदानापासून वंचित

आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी

राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २० रोजी पार पडली. या निवडणुकीत मतदानाचा टक्‍का देखील मोठ्या प्रमाणात वाढला. यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. मात्र, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या राज्‍यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍याचे मुख्य निवडणूक अधिकारी व मुख्य सचिव (म.रा.) यांच्याकडे केली आहे.

विधानसभा निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्‍यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यासाठी त्यांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले होते. पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी पोस्टल बॅलेटसाठी त्यांच्याकडून फॉर्म नंबर १२ भरून घेण्यात आला होता. त्यासोबत मतदान कार्डची झेरॉक्ससुद्धा घेण्यात आली होती. परंतु, फॉर्म नंबर १२ भरूनही राज्‍यातील निवडणुकीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या अनेक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बी.एल.ओ. यांना अद्यापही पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याने राज्‍यातील अनेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले आहे. “निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क मिळालाच पाहिजे. त्यांना पोस्टल बॅलेट न मिळाल्याने त्यांचा हक्क नाकारला गेला आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.”

काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत आपली नाराजी आमदार अडबाले यांच्याकडे व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेत ते स्वतः योगदान देत असतानाही त्यांचा मतदानाचा हक्क नाकारला गेला. अनेकांनी वेळेत अर्ज सादर करूनही पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. यावर आमदार अडबाले यांनी या तक्रारींची दखल घेऊन शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवण्यात येत असल्‍याचा आरोप केला आहे. त्‍यामुळे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍याचे मुख्य निवडणूक अधिकारी व मुख्य सचिव (म.रा.) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.