जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 65.88 टक्के मतदान
50 उमेदवारांचे भाग्य मशीन बंद
भंडारा दि.20: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात आज बुधवार (20 नोव्हेंबर) शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील तिन्ही 60- तुमसर, 61- भंडारा व 62- साकोली विधानसभा मतदारसंघातील 50 उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात दुपारी 5 वाजेपर्यंत भंडारा 62.78 टक्के, तुमसर 68.27 टक्के तर साकोली 67.21 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 65.88 टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी सकाळी 7 वाजेपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकूण 10 लाख 16 हजार 870 मतदार आहेत. यामध्ये 5 लाख 6 हजार 974 पुरुष मतदार आणि 5 लाख 9 हजार 892 स्त्री मतदार असून 4 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात एकूण 5 हजार 276 अधिकारी-कर्मचारी मतदान पथकात कार्यरत होते. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती. युवा मतदारांनी उत्साहाने मतदान करुन या सेल्फी पॉईंटसमोर आपली छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमावर टाकली. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग, नव मतदारांसाठी विशेष मतदान केंद्र निर्माण करण्यात आली होती.
जिल्ह्यातील दिव्यांग व वयोवृध्द मतदारांना मतदान करता यावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. यावेळी दिव्यांग व वयोवृध्द मतदारांनी देखील उत्साहाने मतदान केले. निवडणूक विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.