भेंडी पिक विषयाची कार्यशाळा संपन्न
भंडारा दि. 8 : सहकार व पणन विभाग अंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित,महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प नागपूर, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विभाग व आत्मा विभाग, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 08 ऑक्टोबर, 2024 रोजी भेंडी – उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन श्री. इंद्रलोक सभागृह, जिल्हा भंडारा या ठिकाणी करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी भंडारा जिल्ह्यातील भेंडी लागवड करणारे शेतकरी, शेतकरी उत्पादक गटाचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उर्मिला चिखले, प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा भंडारा, माननीय अजय राऊत प्रकल्प उपसंचालक आत्मा भंडारा, हेमंत जगताप मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल, शिवाजीनगर पुणे किशोर पाथरीकर, उपविभागीय कृषी अधिकारी, साकोली, शांतीलाल गायधने, नोडल अधिकारी स्मार्ट,भंडारा,, रुपेश माने,कृषी व्यवसाय तज्ञ, मॅग्नेट नागपूर, प्रिया झाडे प्रकल्प सहाय्यक तथा मास्टर ट्रेनर मॅग्नेट नागपूर, सुमेध कांबळे, कन्सल्टंट मॅग्नेट नागपूर, ओम प्रकाश सुखदेव, मॅग्नेट नागपूर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी उर्मिला चिखले यांनी भंडारा जिल्ह्यामध्ये भेंडी पिकाचे क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने भेंडी पिकाची लागवड करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. कृषी विभागाअंतर्गत असणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले. कृषी विभागामार्फत आवश्यक ती सर्व मदत भेंडी विक्रीसाठी शेतकऱ्यांना केली जाईल असे त्यांनी आश्वासित केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे चे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, हेमंत जगताप – यांनी मॅग्नेट प्रकल्प व त्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांची भूमिका शेतकरी वर्गास स्पष्ट केली. तसेच, भेंडी हे अत्यंत अर्थक्षम असे पीक आहे. त्यासाठी आपल्या भागातील जमीन व हवामान अत्यंत पोषक आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला भेंडी पीक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी मॅग्नेट प्रकल्पाचे आभार मानले. रुपेश माने कृषी व्यवसाय तज्ञ मॅग्नेट नागपूर यांनी मॅग्नेट प्रकल्प व सहकार पणन विभागाच्या योजनांची माहिती दिली. तसेच या एक दिवसीय प्रशिक्षणातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भेंडी पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी करावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये डॉ. सुधीर ढापते यांनी निर्यातक्षम भेंडी लागवड तंत्रज्ञान व भेंडी पीक गट शेती व मार्केटिंग व्यवस्थापन या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन केले. प्रिया झाडे यांनी भेंडी पिकाचे काढणी पश्चात व्यवस्थापन याविषयी माहिती शेतकऱ्यांना दिली. किशोर पाथरीकर यांनी भाजपाला पिकांसाठी विविध शासकीय योजना या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. लिंग समानता व सामाजिक समावेषण याविषयी ओम प्रकाश सुखदेवे ,मॅग्नेट नागपूर यांनी माहिती दिली.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये भंडारा जिल्ह्यातील 200 हून अधिक शेतकरी उत्पादक कंपनी संचालक, सभासद व प्रगतशील शेतकरी यांनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्मा विभाग भंडारा व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांचे विकास कटरे, तुषार सपाटे, अमित ठवकर,अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभले.