सिंदेवाही येथे ७० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या हस्ते भूमिपूजन
सिंदेवाही – लोनवाही नगरीची पेयजल समस्या निकाली
गेल्या अनेक वर्षांपासून जलस्त्रोत अभावी सिंदेवाही – लोनवाही शहरातील नागरिकांना मुबलक शुद्ध पेयजल मिळविण्यासाठी धडपड करावी लागत होती. याची गंभीर दखल घेऊन राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी वेळोवेळी केलेला पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून नवीन पाणीपुरवठा योजने करिता ७० कोटी ४ लक्ष विकास निधीस मंजुरी मिळाल्याने नुकताच पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडला.
आयोजित भूमिपूजन कार्यक्रमास प्रमूख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतिश वारजुरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुराव गेडाम, काँग्रेस शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, तालुका काँग्रेस सावली अध्यक्ष नितीन गोहने, नगराध्यक्ष भास्कर नन्नावार , उपनगराध्यक्ष पूजा रामटेके, माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी उपनगराध्यक्ष मयूर सूचक, तालुका महिला आघाडी अध्यक्ष सीमा सहारे, शहरअधक्ष प्रीती सागरे, सावली उपनगराध्यक्ष संदीप पुण्य पवर
बांधकाम सभापती दिलीप रामटेके, पाणीपुरवठा सभापती पंकज नन्नेवार तथा सिंदेवाही – लोनवाही नगरपंचायतिचे सर्व नगरसेवक पदाधिकारी कर्मचारी तसेच शहरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शनपर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, एक जबाबदार लोकप्रतिनिधी नात्याने क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे आद्य कर्तव्य असून क्षेत्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. शहरातील विविध विकास कामांसाठी विरोधी बाकावर असताना सुद्धा कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून देऊन अनेक विकास कामांना मंजुरी मिळवून दिली व पुढेही करत राहणार. शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा याकरिता नजीकच्या आसोलामेंढा तलावातून पाईपलाईन द्वारे पाणी पोचव संपूर्ण शहराची तृष्णा भागविण्याची संधी मला मिळाली हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक युनूस शेख प्रास्ताविक नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, यांनी केले. आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.