एक विद्यार्थी एक झाड स्पर्धेत ३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग   १० ऑक्टोबर रोजी लकी ड्रॉ द्वारे होणार निकाल घोषित

एक विद्यार्थी एक झाड स्पर्धेत ३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग  
१० ऑक्टोबर रोजी लकी ड्रॉ द्वारे होणार निकाल घोषित

चंद्रपूर ०७ ऑक्टोबर – चंद्रपूर महानगरपालीकेतर्फे राबविण्यात आलेल्या एक विद्यार्थी एक झाड स्पर्धेचा निकाल १० ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार असुन लकी ड्रॉ द्वारे स्पर्धेचे विजेत्यांना पुरस्कृत केले जाणार आहे.
शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लावणे व त्यांना जगविणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने का आवश्यक आहे याची जाणीव शालेय जीवनातच व्हावी या उद्देशाने  एक विद्यार्थी एक झाड ही स्पर्धा शालेय स्तरावर घेण्यात आली होती. शालेय शिक्षकांच्या माध्यमातुन वृक्षलागवड व संगोपनाद्वारे जेव्हा हे प्रत्यक्षरीत्या घडतांना विद्यार्थी पाहतो, तेव्हा वृक्षांविषयी जिव्हाळा निर्माण होऊन वृक्षाचे महत्व त्याच्या मनावर बिंबते. चंद्रपूर शहरातील सर्व विद्यार्थी शालेय जीवनातच पर्यावरणाप्रती जागरूक व्हावे हाच या स्पर्धेचा उद्देश होता. शहराचे ग्रीन झोन वाढविण्यास घेण्यात येणाऱ्या एक पौधा एक विद्यार्थी स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करणे,वृक्षाचे संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. झाडाचे संगोपन करून वाढविल्याबद्दल विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्रदेऊन प्रोत्साहीत केले जाणार आहे.
सदर स्पर्धेत ६४ शाळांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी २४ शाळांनी विद्यार्थी – वृक्षांचे फोटो हे ऑनलाईन अपलोड केले होते. या शाळांमधील ३००० विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड केली होती. ऑनलाईन अपलोड केलेल्या छायाचित्रांमधूनच विजेत्यांची निवड केली जाणार असल्याने १० तारखेपर्यंत सर्व शाळांनी त्यांच्या कडील वृक्ष लागवडीचे फोटो अपलोड करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.