आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने पत्रके, भित्तिपत्रके इ. मुद्रणावरील निर्बंध
भंडारा, दि.7 : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम मा. भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीचे अनुषंगाने पत्रके, भित्तीपत्रके इ. मुद्रणांचे संनियंत्रणासाठी भंडारा जिल्हयातील सर्व मुद्रणालये यांचे लक्ष लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 127-क च्या आवश्यकतांकडे वेधणेत येत आहे. यानुसार…..
कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहेत.
कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वत:च त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वत: स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणा-या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये.
यानुसार दिलेल्या सुचनांप्रमाणे निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित करणा-या व्यक्तीने कार्यवाही केल्यावर आणि मुद्रकाने मुद्रण केल्यानंतर मुद्रित साहित्याची प्रत जिल्हा निवडणुक अधिकारी भंडारा तसेच संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे पाठवावयाची आहे. अन्यथा संबंधित मुद्रणालयाचे लायसन्स रद्द करणेसह कठोर कारवाई करण्यात येईल.
या ठिकाणी निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक याचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी वाटणेत आलेले मुद्रतपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणूकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तीफलक असा होतो.जी व्यक्ती उपरोक्त निर्बंधांचे व्यतिक्रमण करील ती व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असु शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षास पात्र असेल. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढविणारे उमेदवार, राजकीय पक्ष तसेच मुद्रणालय चालक यांनी या सूचनांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आयोगाचे या संबंधित निर्देशांचे अवलोकन करावे,असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी कळवले आहे.