मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना-विदर्भातील पहीली रेल्वे भंडा-यातून रवाना राज्यस्तरीय शुभारंभ
- ‘जय श्रीराम जय जय श्रीराम’च्या जयघोषात ८०० जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ
- राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. राज्यात कोल्हापूर, जळगाव, मुंबई नंतर विदर्भातील पहीली तीर्थ दर्शनची रेल्वे भंडा-यातून आज वरठी रेल्वे स्टेशन, भंडारा रोड येथून रवाना झाली.
यावेळी आमदार परिणय फुके, आमदार नरेंद्र भौंडेकर,आमदार राजु कारेमोरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रेल्वे रवाना करण्यात आली.
‘जय श्रीराम जय जय श्रीराम’ च्या जयघोषात 800 जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले. यावेळी सोबत जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, प्रादेशीक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, डॉ. दिपचांद सोयाम जिल्हा शल्य चिकीत्सक उपस्थित होते.
आमदार परिणय फुके यांनी, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील विदर्भातील पहिली रेल्वे भंडा-यातून योध्येसाठी रवाना होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर साकारलयं. प्रभू रामांचं दर्शन घेण्याचं संधी या यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या यात्रेकरूंना मिळतेय, त्यामुळे भंडारा ते अयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठांना राज्य व देशातील तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच आध्यात्मिक समाधान मिळवणं सोपं होणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन केल्या आहेत. निवड झालेल्या लाभार्थ्यांचा आपण प्रवास, निवास, भोजन खर्च करणार आहोत. भारतातील 73 आणि आपल्या राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश केलाय. ही योजना पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येतेय. अशा रितीनं भंडारा जिल्ह्याने विदर्भातून या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या शुभारंभाचा मान पटकावला असल्याचे आमदार नरेंद्र भौंडेकर यांनी सांगितले.त्यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या.
तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषध, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे, वैद्यकिय मत तीसाठी तर आयआरसीटीसीचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
शासनाकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आज शुभारंभ होतोय याचा आनंद झाल्याचे सांगून आमदार राजू कारेमोरे म्हणाले, या यात्रेकरूंना प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता आपले अधिकारी घेत आहेत. पहिली रेल्वे अयोध्येला जाताना व त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना फार मोठं समाधान होतय. श्रीरामांचं दर्शन घडविण्याचा हा फार मोठा क्षण असून आपल्या आई वडिलांप्रमाणे या यात्रा कालावधीत सर्व शासकीय अधिकारी त्यांची सेवा करतील. या योजनेतून आयआरसीटीसी कडून चांगल्या गुणवत्तेचा मोफत चहा, नाष्टा, जेवण दिले जाणार आहे. जिल्हयातून 2983 अर्ज आले होते, लोकसंख्येच्या प्रमाणात 800 कोटा प्रथम आला असून यातील पारदर्शकपणे निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन त्यांनी केले. भंडारा जिल्हयातील हा क्षण अविस्मरणीय आहे. ज्या लोकांना सहजासहजी श्रीरामांचं दर्शन घेता येणार नाही त्यांच्यासाठी शासनाकडून या योजनेद्वारे चांगली सोय केली आहे. दिमाखदार सोहळ्यातून या योजनेची सुरूवात आज जिल्ह्यातून करण्यात आली .
या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त कार्यक्रम कार्यालयामार्फत रेल्वे स्टेशन परिसरात उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.