…तर छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन ! आयएसी अध्यक्ष हेमंत पाटील यांची तयारी 

…तर छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन !
आयएसी अध्यक्ष हेमंत पाटील यांची तयारी 

राज्यात बहुसंख्येत असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या समस्या आहे तश्याच आहेत. तथाकथित ओबीसी नेत्यांनी , विशेषत: राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी समाजाच्या मतांचा वापर केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी करून घेतला, असा थेट आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आय एसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.२८) पत्रकार परिषदेतून केला. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पुर्ण समर्थन असल्याचे यावेळी पाटील यांनी जाहिर केले. जरांगे पाटील यांनी संधी दिली, तर तमाम ओबीसी आणि मराठा बांधवांच्या वतीने नाशिक मधून छगन भुजबळांविरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे देखील हेमंत पाटील म्हणाले.भूजबळ आणि काही तथाकथित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी राज्यभरात त्यांच्याविरोधात समक्ष उमेदवार देण्याचा संघटनेचा प्रयत्न असल्याचे देखील पाटील म्हणाले.

जरांगेंनी केलेली ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी रास्तच आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने मोठे मन दाखवून जरांगे पाटल्यांच्या या मागणीचे समर्थन करीत त्यांचे नेतृत्व स्वीकारले तर निश्चितच आगामी काळात ओबीसी-मराठा समाजाच्या नेतृत्वाला एक नवीन दिशा मिळेल,असे भाकित देखील पाटील यांनी व्यक्त केले. ओबीसी समाजाच्या तरुणांमध्ये बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रचंड नैराश्य पसरल्याचे चित्र आहे.ओबीसींसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहचल्या नाहीत.समस्यांचे डोंगर त्यामुळे वाढतच आहे.

काही तथाकथित नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्दयावर ओबीसी विरोधात मराठा असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला.पंरतु, आता राज्यातील ओबीसी-मराठा बहुजनांना भासणारी सक्षम नेतृत्वाची पोकळी जरांगे पाटीलच भरू शकतात,असा विश्वास यानिमित्ताने पाटील यांनी व्यक्त केले.आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातून २५ ओबीसी आमदार निवडून आणण्याचा मानस असून या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून समाजाला एक प्रबळ नेतृत्व प्रदान करण्यासाठी मराठा आणि ओबीसी बांधव एकजुटीने आणि एक दिलाने लढवणार असल्याचे पाटील म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे पाटील म्हणाले.

‘ओम’फॅक्टरमुळे विधानसभा निवडणूक चुरशीची-राजेंद्र वनारसे
आगामी विधानसभा निवडणुकीत ‘ओम’ (ओबीसी-मराठा) फॅक्टर निकालाची दिशा बदलवेल.तथाकथितांचे त्यामुळे धाबे दणाणले आहेत.यंदाची निवडणूक त्यामुळे निर्णायक ठरेल, असा दावा ओबीसी नेते राजेंद्र वनारसे यांनी केला.राज्यातील प्रत्येक बुथवरील ओबीसी-मराठा बांधवांना एकत्रित करीत आंदोलनाचा पाया आणखी भक्कम केला जाणार असल्याचे वनारसे म्हणाले.

फुट पाडणार्यांना योग्य जागा दाखवा-ऍड.म्हस्के
ओबीसी आणि मराठा बांधवांनी एकत्रित येवून समाजात फुट पाडणार्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली तरच आगामी काळात जातीय तेढ निर्माण करण्याची कुणाची हिमंत होणार नाही.राज्यातील विविध मतदार संघामध्ये मराठा आरक्षणाविरोधातीन नेतृत्वाविरोधात सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न असल्याचेमराठा समाज समन्वयक ऍड.गणेश म्हस्के पाटील यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. ओबीसी नेते हेमंत पाटील यासंदर्भात लवकरचे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हस्के म्हणाले.राज्यव्यापी दौरा करीत पाटील यांनी ओबीसी बांधवांना एकत्रित करण्याचे आवाहन देखील त्यांनी यानिमित्ताने केले.

ओबीसींना मराठा समाजाचा पाठिंबा-ऍड.वाजेद खान
एखाद्या समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद महत्वाची ठरते. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळाले, तर त्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. ओबीसींना मराठा समाजाचा पाठिंबा आहेत, असे मुस्लिम समाज समन्वयक ऍड.वाजेद खान यांनी स्पष्ट केले. काही समाजकंटकांनी ओबीसी बांधवांची दिशाभूल करीत त्यांना मराठ्यांविरोधात उभे करण्याचे काम केले. आता एकत्र विधानसभा निवडणूक लढून मनभेद दूर केला जाईल, असे खान म्हणाले.