राज्यातील सत्तेच्या सारीपाटावर शह-काटशहांच राजकारण सुरू-हेमंत पाटील 

राज्यातील सत्तेच्या सारीपाटावर शह-काटशहांच राजकारण सुरू-हेमंत पाटील 

शरद पवारांच्या अनुभवाचा मविआला फायदा होण्याची शक्यता


राज्यात बहुप्रतिक्षित  विधानसभा निवडणुकीची घोषणा कुठल्याही क्षणी होवू शकते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक आयोग राज्यातील स्थितीचा आढावा घेवून मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहे. अशात निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सत्तेच्या सारीपाटावर शह-काटशहांचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसून येत असल्याचे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी सोमवारी ( दि.२३ सप्टेंबर) व्यक्त केले. 

तिकीट वाटपाचा अंदाज घेऊन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. नाराज संभाव्य उमेदवारांना पक्ष प्रवेश देत, नेते मंडळी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी सोडत नसल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.

शरद पवार यांच्या पक्षाचे शिवसेनेप्रमाणे दोन गट झाले असले तरी, प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या बळावर त्यांचा पक्ष चांगली कामगिरी करीत किंगमेकरच्या भूमिकेत राहील, असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला आहे. असे असले तरी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि राजकीय व्युहरचनेच्या आधारे भाजप मोठा पक्ष ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरे आणि पवारांच्या बाजुने भावनिक वातावरणाची लहर आहे. कॉंग्रेसने देखील गेल्या काळात राज्यात संघटनात्मक आघाडी घेत पक्षाच्या कार्यकत्र्यांना संजीवणी दिली आहे. भाजपने बुथ स्तरापर्यंत संघटनात्मक रचना कार्यान्वित केली आहे. 

महायुतीत असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनकल्याणकारी योजनांमुळे फायदा होवू शकतो. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील त्यांनी घेतलेल्या प्रशासकीय निर्णयांच्या धडाक्यांमुळे उर्जा प्राप्त झाली असल्याचे मत पाटील यांनी पत्रकातून व्यक्त केले आहे.  महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशा थेट सामना यंदाच्या निवडणुकीत रंगणार असल्याने बऱ्याच ठिकाणी अत्यल्प फरकांनी उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. अशात सर्वसामान्यांच्या नेतृत्व निवडीच्या कौशल्याचा कस खर्या अर्थाने यंदाच्या निवडणुकीत लागणार असल्याचे पाटील म्हणाले. 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात शरद पवारांची राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष ठरेल, तर भाजप दुसर्या क्रमांकाचा पक्ष राहील, असे भाकित पाटील यांनी वर्तवले. मविआतील राष्ट्रीय पक्ष कॉंग्रेस तिसऱ्या क्रमाकांवर आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहील. महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पाचव्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस सहाव्या क्रमांकावर राहतील, असा अंदाज देखील पाटील यांनी व्यक्त केला.