ओ.बी.सी प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील
युवक-युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना
मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि लिंगायत समाजासाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना दि. 9 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार झाली आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कार्यान्वित करण्यात आले आहे. या महामंडळामार्फत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आय.टी.आय. मागे गडचिरोली दुरध्वनी क्रमांक 07132-223024 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, गडचिरोली येथील जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
रु. 1 लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना: शासनाने इतर मागास प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील व्यक्तींना स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरू करण्याकरीता रु. 1.00 लक्ष ची निरंक व्याजदर असलेली थेट कर्ज योजना सुरु केली आहे. सदर योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे कर्ज परतफेडीचा कालावधी हा 4 वर्षापर्यंतचा असून नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल रु. 2085/- परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. 4% व्याज आकारण्यात येईल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.00 लक्ष पर्यंत असावे.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना: योजनेचा उद्देश: इतर मागास प्रवर्गातील गुरव आणि लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांकरीता उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता गुरव आणि लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे.
योजनेचे स्वरूप –
1. राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रू. 10.00 लक्ष पर्यंत.
2. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रू. 20.00 लक्ष पर्यंत.
लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती –
1.अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे.
2.अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा.
3.अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता रू. 8.00 लक्ष पर्यंत असावी.
4. अर्जदार हा इयत्ता 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60% गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर 0,-1 ( म्हणजेच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे ) किंवा 500 पेक्षा अधिक असावा.
कार्यपद्धती – सदर योजना पुर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: उद्देश: महाराष्ट्र राज्यातील गुरव आणि लिंगायत समाजातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र, इ. व्यवसायाकरिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे.
योजनेचे स्वरुप: बँकेमार्फत लाभार्थींना रु. 10.00 लक्ष पर्यंत कर्ज वितरीत केले जाईल. कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12% च्या मर्यादेत) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रामाणिकरणानुसार लाभार्थींच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजनेमध्ये अर्जादारचे वय 18 ते 50 वर्षे असावे तसेच कुटुंबातील वार्षिक मर्यादा रु. 8.00 लक्ष पर्यंत आहे. हि योजना संपूर्णपणे संगणीकृत असून महामंडळाचे वेब पोर्टल www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.
रु. 5 लक्ष पर्यंतची 20 टक्के बीज भांडवल योजना: बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कमाल मर्यादा रु. 5.00 लाखापर्यंतच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तसेच पारंपारिक लघु व सेवा उद्योगासाठी महामंडळामार्फत कर्ज देण्यात येते. नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजूर कर्ज रकमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर 6 टक्के व्याज दर असून बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर लागू राहील. सदर कर्जाची परतफेड 5 वर्षापर्यंत करता येईल. सदर योजनेत अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे व कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1.00 लक्ष पर्यंत असावे.