नदीपात्रातील विसर्जन व्यवस्थेची प्रशासनाद्वारे संयुक्त पाहणी

नदीपात्रातील विसर्जन व्यवस्थेची प्रशासनाद्वारे संयुक्त पाहणी
मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

चंद्रपूर – आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन,पोलीस विभाग व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे मूर्ती विसर्जन स्थळी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची गुरुवार २९ ऑगस्ट रोजी संयुक्तरित्या पाहणी करण्यात आली.याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी आवश्यक त्या सुधारणा सूचित करून पुढील तीन ते चार दिवसात संपूर्ण व्यवस्था निश्चित करण्याचे निर्देश दिले.
येत्या ७ सप्टेंबर पासुन गणेशोत्वास सुरवात होत असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे आकार व उंचीने मोठ्या असलेल्या मूर्तींची स्थापना करण्यात येते. शहरात ३०० हुन अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत, या सर्व मूर्तींचे विसर्जन एकाच जागी सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासुन दाताळा रोडवरील रामसेतु पुलालगतच्या जागेत मोठे विसर्जन कुंड तयार करण्याच्या कामाची सुरवात करण्यात आली होती.
मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या या विसर्जन कुंडाची क्षमता अंदाजे ३० लाख लिटर पाण्याची असुन ८१३७ स्केयर फुट क्षेत्रफळ आहे. १० फुट पर्यंत उंची असलेल्या मूर्तींचे यात विसर्जन करता येणे शक्य आहे.त्यापेक्षा मोठी मूर्ती असल्यास विसर्जनास अडथळा निर्माण होऊ शकतो. एकावेळेस २ मोठी वाहने उभी राहण्यास २ वेगवेगळे प्लॅटफॉर्म बनविण्यात आले असुन क्रेनच्या साहाय्याने मोठ्या मूर्तींचे विसर्जन करता येणे शक्य होणार आहे.
जिल्हा प्रशासन,पोलीस विभाग व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्तरित्या नियोजन करून विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवुन उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार आहे. याप्रसंगी आयुक्त विपिन पालीवाल, पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त मंगेश खवले, कार्यकारी अभियंता विजय बोरीकर, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, सिद्दीक अहमद, जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली, महावितरण विभागगाचे संबंधित अधिकारी पाहणी दरम्यान उपस्थित होते.