मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्हयाची भरारी एक हजारहून अधिक युवक-युवती रूजू

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्हयाची भरारी एक हजारहून अधिक युवक-युवती रूजू

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध आहेत. तथापि, असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणाऱ्या दुव्यांच्या अभावामुळे युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळण्यात अडचणी येतात. हे लक्षात घेऊन राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे.

भंडारा जिल्हयात या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये विविध आस्थापनामध्ये 1026 उमेदवार रुजु झाले आहे. तर 600 उमेदवार पुढील काही दिवसात रूजू होतील.शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे अगदी कमी वेळेत टिम वर्कने व जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सुधाकर झळके व त्यांच्या चमुनी हे साध्य केले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, आयटीआय / पदविकाधारक विद्यार्थ्यांना 8 हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने देण्यात येणार आहे.

लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना/महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, २०१३ मधील सेक्शन ८) आणि विविध आस्थापनेवर हे 1026 उमेदवार रूजु झाले आहे.

यासाठी 2600 हून अधिक उमेदवारांनी तर 626 खासगी व शासकीय आस्थापनांनी मागणीची नोंदणी केली होती.

सहायक आयुक्त कार्यालयाने मिशन मोडवर ही योजना राबवली.त्यातुन 1026 उमेदवारांची निवड झाली व ते रूजु झाले. राईस मिल तसे महाविदयालय व औदयोगिक आस्थापनात 693 उमेदवारासाठी ‍ही प्रक्रीया राबविण्यात येणार असल्याचे श्री. झळके यांनी सांगितले.

या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत 12 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, आयटीआय / पदविकाधारक विद्यार्थ्यांना 8 हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. ही विद्यावेतन रक्कम दरमहा शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना/उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. या ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक (डीबीटी) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल. विद्यावेतनामध्ये सबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा याचा अंतर्भाव राहील. उद्योजक उमेदवारांना या विद्यावेतनाव्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरुपात देऊ शकेल. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर, सबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही. प्रशिक्षणार्थीने वरील अटींची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही. या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थीस कायम / नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही. या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारी (NAPS / MAPS) पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत. एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.