अंध, अपंगाना तीन महिन्यापासून अनुदान मिळत नसल्याने उपासमारीची पाळी शासन – प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी.

अंध, अपंगाना तीन महिन्यापासून अनुदान मिळत नसल्याने उपासमारीची पाळी

शासन – प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी.

सिंदेवाही :- अनाथ, अंध, अपंग यांना मिळणारा निराधार भत्ता मागील
तीन ते चार महिन्यापासून मिळत नसल्याने सर्व अंध अपंग बांधवांवर उपासमारीची पाळी आली असून शासन आणि प्रशासन यांनी याबाबत त्वरित दखल घेऊन अपंगाना मिळणारा निराधार भत्ता तात्काळ देण्यात यावा अशी मागणी दिव्यांग विकास संस्था देलनवाडी चे अध्यक्ष नितीन रामटेके यांनी केली आहे.
केंद्रातील आणि राज्यातील शासन मार्फत अनाथ, अंध, अपंग, वयोवृद्ध, विधवा, परितक्त्या, या घटकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, यामार्फत दरमहा १५०० रुपये अनुदान देण्यात येते. त्यामुळे आज राज्यातील अंध , अपंग, वयोवृद्ध यांना दोन वेळचे जेवण मिळत आहे. शासनाकडून मोफत मिळणारे अन्नधान्य आणि दरमहा १५०० अनुदान यामुळे अंध, अपंग बांधवांचे कुटुंब कसे तरी जगत आहे. मात्र मागील ३ ते ४ महिन्यापासून अनुदान मिळणे बंद झाले असल्याने अनेक अंध अपंग बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. अंध ,अपंग बांधव कोणत्याही मजुरीला जावू शकत नाही. त्यांचा संसाराचा भार शासनाकडून मिळणाऱ्या निराधार भत्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शासन प्रशासन यांनी या अनाथ, अंध, अपंग, वृद्ध बांधवांची परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ अनुदान देण्यात यावे. अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष नितीन रामटेके, उपाध्यक्ष गुरुदास भरडकर, दिव्यांग जिल्हा प्रभारी जगदीश मेश्राम यांनी केली आहे.