आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदीच्या धोरणात्मक चर्चा संपन्न
भंडारा, दि.26 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीच्या अनुषंगाने अडीअडचणीबाबत धोरणात्मक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. मुंबई चे नागपूर विभागीय संचालक तथा संचालक सदस्य जिल्हा सल्लागार समिती अतुल गंगाधर गण्यारपवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पणन अधिकारी कक्षात १९ जुलै, २०२४ रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जिभकाटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विनायक बुरडे, जिल्हा पणन अधिकारी, सहाय्यक जिल्हा पणन अधिकारी, व “अ’ वर्ग संस्था सभासद प्रामुख्याने उपस्थित होते.विनायक बुरडे सुचक आणि अध्यक्ष यांच्या सुचनेवरून जिल्ह्यातील संस्था म्हणून जिल्हा कृषी औद्योगिक संघ लि.किरण अतकरी यांची निवड झाली.
यावेळी गण्यारपवार यांनी धानाचे चुकारे तात्काळ अदा होण्यासाठी मंत्रालय स्तरावर आणि केंद्रीय स्तरावर दुरध्वनीवरून चर्चा करून धानाचे चुकारेमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीबाबत चर्चा करून विषय लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी प्रयत्न केले.
तसेच सभेसाठी उपस्थित “अ’’ वर्ग संस्था प्रतिनिधींनी देखील संस्थांना मिळणारे कमिशन, हमाली, गोदाम भाडे रक्कम तसेच शासन निर्णयानुसार धानाची भरडाई करण्यास विलंब होत असल्याने संस्थांना येणारी घट ही परवडणारी नसल्याने शासनस्तरावर या बाबतीत पाठपुरावा करून तात्काळ निर्णय घेण्याबाबत अध्यक्षांना विनंती केली.अध्यक्ष सर्व “अ’ वर्ग संस्थांचे अडचणी समजून घेऊन सकारात्मक वातावरणात चर्चा करून यापुढील काळामध्ये पणन महासंघ सर्व संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,असे जिल्हा पणन अधिकारी, यांनी केले.