मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 66 अर्ज प्राप्त

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 66 अर्ज प्राप्त

दि.24: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांसाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत 66 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके यांनी  आज दिली.

‘काय आहे योजना?

महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.

कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार आहे.

या योजनेचा जिल्ह्यातील अंमलबजावणीच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कौशल्य विकास विभाग शासकीय आयटीआय, औद्योगिक संस्था आणि शासकीय विभाग यांची नुकतीच एकत्रितरित्या बैठक घेतली.

या योजनेतून शासकीय कार्यालयांना मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे .त्यासाठी लवकरच विभागांनी  मनुष्यबळ आवश्यकता जिल्हा प्रशासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास श्री. झळके यांना दिले.

उमेदवाराची पात्रता

किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय, पदवीका, पदवी, पदव्युत्तर असावी. मात्र, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे आधार नोंदणी असावे. बँक खाते आधार संलग्न असावे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.