पीक विमा भरण्यास राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून मुदतवाढ

पीक विमा भरण्यास राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून मुदतवाढ

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राची दखल

Ø चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा

चंद्रपूर, दि. 24 : पीक विमा योजनेशी संबंधित जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला असून, विमा भरण्याची अंतिम तारीख आता 31 जुलै 2024 पर्यंत वाढविण्याचा निर्णय कृषी मंत्र्यांनी जाहीर केला आहे. या संदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना 12 जुलै 2024 रोजी विनंती पत्र देऊन मुदतवाढ करण्याची मागणी केली होती.

चंद्रपूर कृषीप्रधान जिल्हा असून जिल्ह्यामध्ये 3.33 लक्ष शेतकरी पीक विमा योजनेचे  खातेधारक आहेत.  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024-25   अंतर्गत विमा काढण्याची मुदत ही 15 जुलै 2024 पर्यंत होती. शेतकरी खरीप हंगामातील शेतीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे व विमा भरताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे  जिल्ह्यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा काढलेला नव्हता. त्यामुळे अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे बहुतेक पिकांचे नुकसान झाले तर पीक विमाआभावी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान  होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरण्याची मुदत  31 जुलै 2024 पर्यंत वाढवून मिळण्याची विनंती पालकमंत्री व राज्याचे वन सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.

कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देत मागणीची दखल घेतल्याचे कळविले आहे. सदर निर्णयामुळे शेतकरी बांधवांमध्ये  आनंदाचे वातावरण असून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.