मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा Ø जिल्हाधिका-यांचे शासकीय विभाग, उद्योग व आस्थापनांना निर्देश

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

Ø जिल्हाधिका-यांचे शासकीय विभाग, उद्योग व आस्थापनांना निर्देश

चंद्रपूर, दि. 20 :  शासनाने राज्यातील युवकांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शासनामार्फत शैक्षणिक अर्हता 12 वी पास करीता प्रतिमाह 6 हजार रुपयेविद्यावेतन, आय.टी.आय/पदविकाधारकास प्रतिमहा 8 हजार रुपये तर पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारास प्रतिमहा 10 हजार याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा विद्यावेतन जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्वांनी सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

शासनाने दिलेल्या विद्यावेतनव्यतिरिक्त प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देण्याची मुभा आस्थापना व उद्योगांना राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये,सहकारी संस्था, कंपनी, लघु, मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप व विविध आस्थापनांनी मनुष्यबळाची ऑनलाइन मागणी त्वरीत नोंदविण्यासाठी  जिल्हाधिका-यांच्या स्वाक्षरीचे पत्र सुध्दा सर्व विभागांना आणि विविध आस्थापनांना पाठविण्यात आले आहे.

            योजनेचे उद्दिष्ट : पात्र उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे

            ठळक वैशिष्ट्ये : 12 वी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारhttp://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. तसेच विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग / स्टार्टअप, विविध आस्थापना इत्यादिंना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकेल. कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्यांचा असून या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. सदर लाभ लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.

            उमेदवारांची पात्रता : उमेदवाराचे किमान वय 18 आणि कमाल वय 35 वर्षे असावे, शैक्षणिक पात्रता 12 वी पास / आयटीआय/पदविका/पदवीधर/ पदव्युत्तर असावी. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, आधार नोंदणी आवश्यक, उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे आणि उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या http://www.rojgar.mahaswayam.gov.in   या संकेतस्थळावर नोंदणी केली असावी.

            असे राहील विद्यावेतन : 12 वी पास करीता 6 हजार रुपये, आयटीआय / पदविका करीता 8 हजार रुपये आणि पदवीधर / पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरीता 10 हजार रुपये.

येथे करा संपर्क : अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172-252295 अथवा हेल्पलाईन क्रमांक 18001208040यावर संपर्क साधावा.