23 मंडळात अतिवृष्टी जिल्हाधिकारी ऑन फील्ड

23 मंडळात अतिवृष्टी जिल्हाधिकारी ऑन फील्ड

भंडारा दि. 20 : जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने  जिल्ह्यातील 23 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.मात्र पावसाने थोडी विश्रांती घेताच  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भंडारा, पवनी ,लाखनी, लाखांदूर या भागाला भेट देऊन पाहणी केली.

काही गावांमध्ये प्रशासनाने  नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. सकाळीच खात रोड येथील पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यासह पाहणी केली. त्यानंतर पवनी  आणि लाखांदूर येथे देखील त्यांनी दौरा केला . यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, पवनी तहसीलदार श्री. सोनोने, लाखांदूर तहसीलदार वैभव पवार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यावेळेस उपस्थित होते.

पावसामुळे घर किंवा मालमत्तेचे नुकसान झाले झाले असल्यास पाणी ओसरल्यावर तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. तसेच नागरिकांना आवश्यकतेनुसार औषध सुविधा आणि निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्याची निर्देश ही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नगरपालिका भंडारा, तसेच पवनी आणि लाखांदूर येथील नगरपालिकेतर्फे साचलेले पाणी काढण्यात आले आहे.यावेळी  गाव पातळीवरील यंत्रणेने दक्ष राहावे. पूर परिस्थिती व प्रशासनाशी समन्वय करून वेळोवेळी माहिती देऊन नागरिकांना मदत करण्याचे ही त्यांनी निर्देश दिले.

तालुकास्तरीय व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालय राहावे व आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज आहे.

जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस, वादळीवारा मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट करीता अलर्ट भारतीय हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यामध्ये 20 जुलै ते 22 जुलै 2024 या कालावधी मध्ये मुसळधार पाऊस, वादळीवारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. दिनांक 20  जुलै 2024 या दिवसाकरिता Orange Alert दिलेला असुन ऑरेंज अलर्ट कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

 या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. विज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

          नागरीकांनी जल पर्यटन स्थळी अती उत्साही होवून जीव धोक्यात घालणारी कुठलीही कृती करू नये. शक्यतो पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करू नये. आपण कितीही चांगले जलतरणपट्टू असले तरी देखील अशा ठिकाणी पोहण्याचे टाळावे. नदी, नाले, दुथळी वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते अशा वेळी चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. आवश्यक खबरदारी घेवून स्वतःची त्याच प्रमाणे आपल्या कुटूंबियांची व मित्र परिवाराची अशा ठिकाणी आवश्यक काळजी घ्यावी व प्रशासनाकडून निर्गमित होत असलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे, काही अडचण आल्यास नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथील संपर्क क्र. 07184-251222 वर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.