जिल्हाधिकारी पोहचले लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी केंद्रात Ø उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद

जिल्हाधिकारी पोहचले लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी केंद्रात

Ø उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद

चंद्रपूर, दि. 19 : ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्य शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. शासन स्तरावर या योजनेचा दैनंदिन आढावा होत असून मोठ्या संख्येने पात्र महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी नोंदणी करावी, यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भर पावसात महानगर पालिकेच्या झोन क्रमांक 3 येथील लाभार्थी नोंदणी केंद्राला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश खवले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, झोन क्रमांक 3 चे सहआयुक्त सचिन माकोडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

मनपाच्या केंद्रात नोंदणी करण्याकरीता आलेल्या पोली पॉल, शुभेच्छा पेंदाम आणि वर्षा गेडाम यांच्याशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी लाभार्थ्यांना कुठून आल्या, योजनेची माहिती कशी मिळाली, अर्ज कोणी भरून दिला, काय कामधंदा करता, कुठे राहता, आदी बाबींची विचारणा केली. तसेच त्यांच्या अर्जाची पाहणीसुध्दा केली. एक अर्ज भरण्यासाठी किती वेळ लागतो, याबाबतही ऑपरेटरकडून माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, नोंदणीचा दैनंदिन अहवाल अपडेट ठेवा. ऑनलाईन आणि ऑफलाईन किती अर्ज भरले, याबाबत रोज रिपोर्टिंग करा. ग्रामीण भागात लाभार्थ्यांची माहिती, चावडी वाचनाद्वारे देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरी भागात महानगर पालिकेने वार्ड स्तरीय समितीद्वारे सर्व नोंदणी केंद्रावर याद्या प्रकाशित कराव्या. जेणेकरून नागरिकांना त्याचे अवलोकन करता येईल, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.