खुनात सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांस गडचिरोली पोलीस दलाने केले अटक

पेनगुंडा येथे झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांस गडचिरोली पोलीस दलाने केले अटक

• महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण १० लाख रुपयांचे बक्षीस.

गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. तसेच माओवाद्यांच्या येणाऱ्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्यांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन माओवाद्यांस आज दिनांक ०९/०७/२०२४ रोजी गडचिरोली पोलीस दलाने अटक केले. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ८१ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित असतांना त्यांना दोन संशयित व्यक्ती पोस्टे धोडराज हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असतांना आढळुन आल्याने विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनंतर त्यांची अधिक सखोल चौकशी केली असता, त्यांची नावे १) रवि मुरा पल्लो (अॅक्शन टिम कमांडर), वय ३३ वर्षे, रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली, २) दोबा कोरके वड्डे (पार्टी सदस्य, भामरागड दलम), वय ३१ वर्षे रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली अशी असून, या दोघांचा माहे नोव्हेंबर २०२३ मध्ये मौजा पेनगुंडा येथे झालेल्या दिनेश गावडे या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पोस्टे धोडराज येथे त्या अनुषंगाने दाखल अप क्र. ०२/२०२३ कलम ३०२,१४३,१४७,१४८,१४९,१२० (ब) भादवि सह कलम ३/२५ भाहका अन्वये गुन्ह्यात अटक करण्यात आली.

शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

१) महाराष्ट्र शासनाने रवि मुरा पल्लो याच्या अटकेवर ०८ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

२) महाराष्ट्र शासनाने दोबा कोरके वड्डे याच्या अटकेवर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिताच्या जवानांनी पार पाडली. तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.