खरीप हंगामातील ११ पिकांसाठी ‘पीक स्पर्धा’  मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै अंतिम तारीख ; अन्य पिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार

खरीप हंगामातील ११ पिकांसाठी ‘पीक स्पर्धा’ 

मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै अंतिम तारीख ;

अन्य पिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार

 नागपूर, दि. 9 : नवनवीन प्रयोगाद्वारे कृषी उत्पादनामध्ये भर घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मार्गदर्शन परिसरातील शेतकऱ्यांना होण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम -2024 मध्ये विविध 11 पिकांसाठी राज्यांतर्गंत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

  मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै तर अन्य पिकांसाठी 31ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. नागपूर विभागातील जास्तीत -जास्त  शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार यांनी केले आहे.

सर्वसाधारण व आदिवासी गटामध्ये भात, ज्वारी, बाजरी , मका , नाचणी (रागी), तूर, मुग, उडीद, सोयाबिन, भुईमुग व सुर्यफुल या 11 पिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत  शेतकऱ्यांना भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबिन, भुईमुग व सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेमध्ये अर्ज करता येणार आहे. सर्वसाधारण गटासाठी प्रती पीक प्रवेश शुल्क 300  रुपये तर आदिवासी गटासाठी प्रती पीक  150 रुपये प्रवेश शुल्क राहणार आहे.

 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी

            या पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे, व स्वत: जमीन कसत असणे आवश्यक आहे. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धकास स्वत:च्या शेतावर स्पर्धेकरिता भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. तालुका स्तरावर  ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत घालून राज्य, जिल्हा, तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्याची निवड करण्यात येईल.

ही कागदपत्रे आवश्यक  

            स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) भरणे आवश्यक आहे. अर्जासोबत प्रवेशपत्र भरल्याचे चलन, 7/12, 8 -अ उतारा,  जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आणि बॅक खाते, चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत जोडणे अनिवार्य आहे.

असे असणार बक्षिसाचे स्वरुप

        स्पर्धेत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शेतकऱ्याला 5,000/- रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी 3,000/- रुपये व तृतीय क्रमांकासाठी 2,000/- रुपये असे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे.  जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शेतकऱ्याला 10,000/- रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी 7,000/- रुपये व तृतीय क्रमांकासाठी 5,000/- रुपये असे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे. राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शेतकऱ्याला 50,000/- रुपये तर व्दितीय क्रमांकासाठी 40,000/- रुपये व तृतीय क्रमांकासाठी 30,000/- रुपये असे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे.या स्पर्धेच्या संदर्भातील अधिक माहिती  राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.