विशेष लेख ; महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..

विशेष लेख ; महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..

         आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता ‘मार्वल’ कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाली असून भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ मिळणार आहे.

            मागील काही वर्षांत कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या माध्यमातून अनेक नवकल्पना निर्मित होऊन प्रगती साधली जात आहे. अनेक वर्षांपूर्वी ज्या बाबी कल्पनेबाहेरच्या वाटत होत्या त्या वैज्ञानिक सिद्धांताद्वारे मान्य होऊन हळूहळू वास्तविकतेत रूपांतरित झाल्या. त्याचेच आजचे आधुनिक स्वरूप म्हणून आपण कृत्रिम बुद्धीमत्तेकडे पाहू शकतो.

            कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी तयार केलेल्या संगणकामधील मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण म्हणता येईल. शिकणे, तर्क करणे, समस्या सोडवणे, समज आणि भाषेचे आकलन ही सर्व या संगणकीय क्षमतांची उदाहरणे म्हणता येतील. संगणक, संगणक-नियंत्रित रोबोट किंवा सॉफ्टवेअर बनवण्याची एक पद्धत आहे जी मानवी मन आणि बुद्ध‍िप्रमाणे विचार करते. मानवी मेंदूचा अभ्यास करून आणि माहितीचे विश्लेषण करून त्याचे परिणाम दर्शविते.

            वास्तववादी आणि उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा, व्हिडीओ आणि ऑडिओ तयार करण्यासाठी सुमारे एक दशकापूर्वी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर भारतात होऊ लागला. त्यासोबतच गुगल एआय, चॅट-जीपीटी आदी माध्यमातूनही याचा वापर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे सिरी किंवा अलेक्सा ही नावे सुद्धा परिचित झाली आहेत. या मशीन्स सुद्धा मर्यादित स्वरुपात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा भाग म्हणता येतील. मानवाप्रमाणे विचार करण्याची कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची क्षमता सिद्ध होऊ लागली आहे. सध्या चॅटबॉट्सने जगात वादळ आणले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात डेटाचे प्रशिक्षण दिले जाऊ लागले आहे. मोठमोठ्या कंपन्या दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आणि कामगारांना मदत करण्यासाठी याची मदत घेत आहेत. मानवी आकलनशक्ती आणि तर्कावर आधारित निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर जटील समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर केला जाऊ लागला आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलाला याचा मोठा लाभ होऊ शकणार आहे.

            सद्यस्थितीत शासनाच्या विविध विभागांकडे प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध असते. पोलीस दलाकडे गुन्हे आणि गुन्हेगारांसंबंधी माहिती मोठ्या प्रमाणावर येत असते. सायबर आणि आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत असून नागरिकांच्या फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबिले जात आहेत. यात गुन्ह्यांचे प्रकार आणि गुन्हेगारांची संख्या देखील मोठी असते. प्रत्येक बाबीत विविध प्रकारे मानवी मेंदूच्या क्षमतेचा वापर करून आणि उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला जातो. तथापि या माहितीचा वापर करून विश्लेषण करायला आणि मनुष्याप्रमाणे निर्णय घ्यायला आधुनिक संगणकालाच शिकविले तर याचा मोठा लाभ होऊ शकतो. हाच धागा पकडून महाराष्ट्र पोलीस दलात एआयचा वापर करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करुन पोलीस दलाला या कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत मिळवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने  16 मार्च 2024 च्या बैठकीत घेतला आणि त्या अनुषंगाने तातडीने पावले उचलून ‘मार्वल’ कंपनीची स्थापना करण्यात आली.

            कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करुन गुप्तवार्ता क्षमता भक्कम करण्यासाठी आणि अपराधांचा पूर्वानुमान लावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच राज्य पोलीस दलास कायदा अंमलबजावणीचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी राज्यात ‘Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement (MARVEL)’ ‘मार्वल’ ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अशा प्रकारचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या कंपनीस शासनामार्फत 4 कोटी 20 लाख रुपये प्रतीवर्ष याप्रमाणे पाच वर्षांकरिता 100 टक्के भागभांडवल देण्यात येणार असून भागभांडवलाचा पहिला हप्ता नुकताच वितरीत करण्यात आला आहे.

            ‘मार्वल’ स्थापन करण्याबाबत राज्य शासन, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर आणि मे. पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या. यांच्यात दि.22 मार्च 2024 रोजी त्रिपक्षीय करार करण्यात येऊन शासनाची ही कंपनी अधिनियम 2013 खाली नोंदणीकृत करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासमोर पोलीस जिमखाना येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिव तथा गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव (अतिरिक्त कार्यभार) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

            पोलीस दलाला कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाल्याने मशीनला माहितीचे विश्लेषण करून आणि मानवाप्रमाणे विचार करायला शिकवून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच होणारे गुन्हे रोखण्यासाठी मोठा लाभ होऊ शकेल. त्याचबरोबर गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत जाणून, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून कुठे गुन्हा घडू शकतो, कुठे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते आदी बाबींचे अनुमान आधीच लावता येऊ शकणार आहे.

            या उपक्रमातील मे. पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या. ही चेन्नई स्थित कंपनी असून त्यांना भारतीय नौदल, गुप्तवार्ता विभाग, आंध्र प्रदेश, आयकर विभाग, सेबी आदी संस्थांना एआय सोल्युशन्स पुरविण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विशेषज्ञतेचा उपयोग व्हावा या उद्देशाने ‘मार्वल’ चे कार्यालय नागपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या आवारात आहे. पोलीस दलाच्या मागणीनुसार ‘पिनाका’ एआय सोल्युशन्स पुरवेल तर, भारतीय व्यवस्थापन संस्था संशोधन आणि प्रशिक्षणामध्ये सहकार्य करणार आहे. नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर चे संचालक हे या कंपनीचे पदसिद्ध संचालक असतील आणि मे.पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या.चे संचालक हे या कंपनीच्या संचालक मंडळावर असणार आहेत. तर नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक हे पदसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.

            देशात नावलौकिक असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाची कार्यक्षमता कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरामुळे आणखी वाढणार असून सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची उकल तातडीने होण्यासाठी हातभार लागेल, यात शंका नाही. ‘मार्वल’ थेट शासनाच्या गृह विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणार आहे. त्यामुळे भविष्यात शासनाच्या इतर विभागांनाही कृत्रिम बुद्धीमत्तेचा लाभ मिळून महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत देश विविध क्षेत्रात जगभरात अग्रेसर राहील, हे निश्चित.                                                                                                                                                -ब्रिजकिशोर झंवर

                                 वरिष्ठ सहायक संचालक

                      माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.