स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदी बाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदी बाबतचे

प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाचे सबळीकरण या योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या दारिद्र रेषेखालील भुमिहीन कुटुंबाना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्या  राहणीमानात बदल व्हावा म्हणून त्यांना कसण्याकरिता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करुन उपलब्ध करुन द्यावयाची आहे. तरी जिल्हयातील गैर आदिवासी  कुटुंबाकडून शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2024-25 करिता अर्ज मागविण्यात येत आहे.

जिरायत जमीन चार एकर व बगायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास सम्मती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करुन जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल.

            अर्जासोबत जमिनीचा 7/12, गाव  नमुना आठ, परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र, अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ, पत्नी, मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी ना-हरकत  व सम्मती प्रमाणपत्र, विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल, शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीन बाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टँप पेपरवर शपथपत्र  व हमीपत्र जोडण्यात यावे.

            सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे किंवा प्रत्यक्ष दिनांक 30 जुलै 2024  पर्यंत संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी कळविले आहे.