तूती लागवड करा, चार लाखाचे अनुदान मिळवा
जिल्हयात 100 एकर तूती लागवडीचे नियोजन
भंडारा, दि.5 जिल्हा हा पारंपारीक भात पिकाचा जिल्हा आहे. सोबतच जिल्हयात टसर रेशीम उद्योगाची संपूर्ण प्रकिया टसर कोष उत्पादन ते कापड निर्मीती केली जात आहे. पारंपारीक शेतीला पर्याय म्हणून जिल्हयात तूती रेशीम उद्योगाचा प्रचार प्रसार करणेचा जिल्हाप्रशासनाचा व जिल्हा रेशीम कार्यालयाचा प्रयत्न आहे. मा.जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर यांचे मार्गदर्शनाखाली रेशीम कार्यशाळा सुध्दा जिल्हयात आयोजीत करण्यात आलेली होती. सध्या जिल्हयात 45 एकर क्षेत्रावर तूती लागवड असून महारेशीम अभियान 2024 अंतर्गत 61 नविन शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.
तूती रेशीम उदयोगामध्ये तूती रोपांची लागवड, तूती झाडाचा पाल्याचा उपयोग करून किटक संगोपन करणे व कोष उत्पादन काढणे ही प्रकीया समाविष्ट आहे. तूती लागवडीकरीता पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. पूर्वी तूतीच्या फांदया पासून कलम तयार करून लागवड केली जायची त्यामुळे 20 ते 25 टक्के तूट पडायची ज्यामुळे प्रती एकरी 5500 झाडांची संख्या राहत नव्हती पर्यायाने प्रती एकरी अंडीपूंजाचे नार्मनुसार संगोपन होत नव्हते. आता 3-4 महिने पूर्ण वाढ झालेल्या रोपापासूंन तूतीची लागवड केले जाते ज्यामुळे तूट पडण्याचे प्रमाण लक्षणीय कमी झालेली आहे. तूती रोपवाटीका जानेवारी अखेर ते फेब्रुवारी अखेर कालावधीत तयार करून त्यामुळे जुलै ते सप्टेंबर मध्ये तूतीची लागवड केली जाते. एकदा तूतीची लागवड केली की 10-12 वर्ष पून्हा लागवड करावी लागत नसल्याने लागवडीचा खर्च वाचतो. 4.5 -5 महिने जून्या झाडाचे पानापासून किटक संगोपन घेता येते. प्रथम वर्षी 200 अंडीपुंज व दुसरे वर्षी 400-600 अंडीपुंजाचे संगोपन घेउन प्रथम वर्षी100-120 kg दुसरे वर्षी 240-360 kg कोष उत्पादन घेता येतात.
तुती रेशीम उद्योग करीता मनरेगा व सिल्क समग्र अश्या दोन योजनेतून अनुदान देय आहे. मनरेगा अंतर्गत तुती लागवड करणे साठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत चे सर्व साधारण सभेचा ठराव घेवून कृती आराखडयात समावेश कामे करीता पंचायत समितीला प्रस्ताव सादर केला याची एक प्रत जिल्हा रेशीम कार्यालयास सादर करावी. संबंधीत ग्रामपंचायत मधील तुती रेशीम उद्योग कामकाज कृती आराखडयात समावेश झाल्यास मनरेगा अंतर्गत असणारा लाभ मिळतो तुती रेशीम उद्योग करीता 03 वर्षा करीता रु. 4,18,815/- चे अनूदान आहे त्यात तुती लागवड, जोपासना, किटक संगोपन व कोष उत्पादन तसेच संगोपन शेड बांधकाम समावेश आहे. तुती लागवड, किटक संगोपन करीता 03 वर्षात 895 रोजमजुरांची अकूशल मजुरी पोटी रु. 2,65,816/- व कुशल साहित्य रक्कम 1,53,000/- याप्रमाणे रु. 4,18,815/- चे अनुदान दिले आहे.
तसेच जे रोजमजूर मनरेगा मध्ये बसत नाही त्यांचे करीता केंद्र पुरस्कृत सील्क सम्रग योजना असून त्यात तुती लागवड करीता रु. 50,000/- , किटक संगोपन साहित्य रु. 75,000/- ,निरजंतुकीकरण रु. 5000/- व रेशीम शेड बांधकाम खर्च रु. 2,43,750/- या प्रमाणे रु. 3,73,750/- युनिट च्या 75% अनुदान देय आहे. सिल्क समग्र योजने अंतर्गत किमान 05 वर्ष पर्यंत तुती लागवड तसेच किटक संगोपन करणे अनिवार्य आहे. तुती लागवड करू इच्छिणारे शेतकऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण जिल्हा रेशीम कार्यालय भंडारा मार्फत देण्यात येईल.
सन 2024-25 मध्ये जिल्हयातील तूती लागवड 100 वर नेण्याचा जिल्हा रेशीम कार्यालयाचा मानस आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तूती लागवड करून शासकीय योजनेतील अनुदानाचा फायदा घ्यावा असे आवाहन श्री अनिलकुमार ढोले रेशीम विकास अधिकारी, भंडारा यांनी केले आहे. तूती लागवडी करीता जिल्हयातील शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा C/o श्री मदान निवास, डोकरीमारे हॉस्पीटल जवळ, राजीव गांधी चौक, भंडारा येथे संर्पक साधावा.