३३ प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृती कार्यशाळा

३३ प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृती कार्यशाळा

            भंडारा,दि.4 : – पावसाळ्यात साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत जनजागृती करण्यासाठी रमेश पारधी आरोग्य व शिक्षण सभापती यांच्या संकल्पनेतून मान्सून पूर्व आढावा सभा प्रत्येक तालुक्यात घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व 33 प्रा आ केंद्र स्तरावर पाणी पुरवठा व स्वछता समितीच्या सर्व कर्मचारी यांची तातडीने कार्यशाळा घेण्याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी याना जी.प. चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद सोमकुंवर यांनी आदेश काढण्यात आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनची गळती होत असल्यास किंवा व्हॉल्वची गळती तातडीने दुरुस्त करावी. पाणी शुद्धीकरण केल्यानंतर अर्ध्या तासाने ओ.टी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास पाणीपुरवठा करण्यात यावा.तीन महिने पुरेल एवढा टीसीएल साठा ग्रामपंचायतीकडे उपलब्ध करून ठेवावा.

: परिसर स्वच्छता व नाले सफाईवर भर द्यावा

         गावाची परिसर स्वछता व नाले साफसफाई युद्धपातळीवर करण्यात यावी. सर्व गटारीचे व पावसाचे पाणी वाहते करावे.पाणी वाहते होत नसेल तर त्यामध्ये डासअळी भक्षक गप्पी मासे सोडण्यात यावे.गावातील खाद्य पदार्थ विक्रेते यांच्याकडील उघड्यावरील खाद्य पदार्थ घेणे टाळावे.आरोग्य कर्मचारी यांनी दैनंदिन कंटेनर सर्वे करावा.तापाचे रुग्ण शोधून उपचार करावा.गावामध्ये कटाक्षाने कोरडा दिवस पाळण्यासंदर्भात ग्रामपंचायतला सहकार्य करावे.गृहभेटी दरम्यान अतिसाराच्या रुग्णाच्या नोंदी ठेवणे आदी उपाययोजनांबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाकडून साथरोग पथकाची नियुक्ती

आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी पावसाळा पूर्व उपाययोजनावर भर दिला जात आहे. तरीही साथीच्या आजाराची लागण झाल्यास संबंधित गावात तातडीने सेवा देण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर साथरोग पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.पावसाळ्या दरम्यान साथीचे उद्रेक अथवा संबंधित आजार आढळ्यास जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक ०७१८४-२९९४४३ वर संपर्क करण्यात यावा किंवा साथरोग नियंत्रण कक्ष अंतर्गत कार्यरत अधिकारी डॉ.श्रीकांत आंबेकर  साथरोग तज्ञ् मो.क्र.९१५८५१२२४२ श्री राजू थाटकर,आरोग्य सहाय्यक मो. क्र.९९२३५२२८७९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

पावसाळ्यात साथीचे आजार उदभवू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक व आरोग्य कर्मचारी यांची जलजन्य साथीच्या आजाराबाबत कार्यशाळा घेऊन प्रचार,प्रसिद्धी करण्यात येत आहे यामुळे साथीच्या आजारांना आळा घालता येणार आहे.׳ असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद सोमकुंवर,यांनी कळविले आहे.