‘तपासणी ते उपचार आरोग्य योजने’ अंतर्गत फिरते वैद्यकीय कक्षाचे उदघाटन

‘तपासणी ते उपचार आरोग्य योजने’ अंतर्गत फिरते वैद्यकीय कक्षाचे उदघाटन

चंद्रपूर, दि. 2 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांकरीता ‘तपासणी ते उपचार आरोग्य योजना’ राबविण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत सदर योजनेचा शुभारंभ आज (दि.2) जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला .

सदर योजनेमध्ये सर्व नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार तसेच त्यांच्या कुटुंबामधील पती अथवा पत्नी व 10 वर्षावरील प्रथम दोन अपत्य हे लाभार्थी असतील. तसेच पात्र लाभार्थी यांच्या उपचारावरील खर्च 5 लक्ष रुपये किंवा अधिक होणार असल्यास या योजनेच्या खर्चाच्या मर्यादेत नियुक्त संस्थेद्वारे सूचिबद्ध केलेल्या रुग्णालयांमार्फत  उपचाराकरिता सदर लाभार्थी पात्र राहतील.

तपासणी ते उपचार आरोग्य योजनेअंतर्गत फिरते वैद्यकीय कक्ष (एम एम यू) हे जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्या क्षेत्रमध्ये कार्यरत असेल तसेच फिरते वैद्यकीय कक्ष ( मोबाईल मेडिकल युनिट ) वाहन स्वरूपामध्ये  उपलब्ध असेल. तसेच टोल फ्री क्रमांक 1800266666666 वर संपर्क साधल्यास आवश्यक औषध व उपचार सुध्दा मिळेल, अशी माहिती फिरते वैद्यकीय कक्ष समन्वयक तथा जिल्हा एम. एम. यू. व्यवस्थापक आशिष चवरे यांनी दिली आहे. तसेच जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी  उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी केले आहे .

उदघाटन कार्यक्रमाला जिल्हा समनवयक  रोशन सूर्यवंशी, डॉ.  लुम्बिनी तावाडे, औषधी व्यवस्थापक  प्रिती देवतळे, आरोग्य साथी जितेंद्र चांदेकर, सहायक औषधी व्यवस्थापक प्रफुल काटकर, व्यवस्थापक पंकज चहारे, परिचारिका अश्विनी आसुटकर तसेच फिरते वैद्यकीय पथक वाहन चालक नाशिक मेश्राम उपस्थित होते.