६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना मिळणार लाभ
मनपातर्फे ५ निःशुल्क सेवा केंद्र सुरू
चंद्रपूर ३ जुलै – ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ” लाभ सर्व महिलांना मिळावा या दृष्टीने राज्य शासनाने या योजनेस ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली असुन चंद्रपूर शहरातील सर्व महिलांना योजनेचा ऑनलाईन व ऑफलाईन लाभ मिळण्याच्या दृष्टीने मनपातर्फे ५ निःशुल्क सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रांचा लाभ सर्व महिलांनी घेण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे
राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची यापुर्वी १५ जुलै पर्यंतच होती मात्र योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन या मर्यादेत आता सुधारणा करण्यात आली असून आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासूनचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
या योजनेतील अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली असून त्याऐवजी १ वर्षापू्वीची शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र चालेल. परराज्यातील महिलांनी राज्यात अधिवास असलेल्या पुरुषांसोबत लग्न केले असेल तर अशा बाबतीत सदर महिलेच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. त्याचप्रमाणे २.५ लाख मर्यादेत उत्नन्नाचा दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका आहे, त्यांना उत्पनाच्या दाखल्यापासून सूट देण्य़ात आली आहे. तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यासोबतच ५ एकर शेत जमिनीची मर्यादाही रद्द करण्यात आली असुन २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र ठरणार आहे. आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजने अंतर्गत थेट १५०० रूपये जमा होणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मनपा मुख्य कार्यालय, ३ झोन कार्यालये तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ( बीपीएल ऑफीस ),सरकारी दवाखान्यामागे, कस्तुरबा रोड ज्युबली शाळेसमोर अश्या ५ ठिकाणी सुविधा केंद्रे सुरु करण्यात आली असुन याठिकाणी महिलांना प्रत्यक्ष अर्ज करता येणार आहे.
योजेनचा काय लाभ होणार ?
१. पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५००/-रुपये जमा होणार
२. ३१ ऑगस्टपुर्वी अर्ज दाखल केल्यास १ जुलैपासुन मिळणार फायदा
नव्या नियमानुसार कोणत्या महिला पात्र? –
१. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे.
२. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
३. किमान वयाची २१ वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणं आवश्यक आहे.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २.५० लाखांपेक्षा जास्त नसावं.
योजनेसाठी अपात्र कोण? –
१) ज्या कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
२) या शिवाय घरातील कोणी उत्पन्नावर टॅक्स भरत असेल
३) कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, कोणी निवृत्ती वेतन घेत असेल
४) ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरही ती अपात्र समजली जाईल.
५) शिवाय ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे –
१. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
२. आधार कार्ड
३. मूळ निवासी प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
४. रेशन कार्ड
५. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला / पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका
६. बँकेचे पासबूक
७. मोबाईल क्रमांक
८. पासपोर्ट फोटो
१. योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल ॲपद्वारे
२. सेतू सुविधा केंद्र
३. मनपा मुख्य कार्यालय सुविधा केंद्र
४. मनपा झोन कार्यालये सुविधा केंद्र
५. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ( बीपीएल ऑफीस ),सरकारी दवाखान्यामागे, कस्तुरबा रोड ज्युबली शाळेसमोर या सुविधा केंद्रांवर प्रत्यक्ष अर्ज करता येईल
६. वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन भरून घेता येईल.
आवश्यकता असल्यास संपर्क करा : अर्ज भरतांना काही समस्या असल्यास मनपाने सुविधा केंद्र स्थापन केले आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक ७७७००१५६६३ तसेच महिला हेल्प लाईन क्र. १८१ वर संपर्क करता येईल.