मधमाशा पालनासाठी 50 टक्के अनुदान 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मधमाशा पालनासाठी 50 टक्के अनुदान
31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

गडचिरोली,दि.03: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) राबविली जाते. यात मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष प्रशिक्षणाच्या सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. यातील वैयक्तिक मधपाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा. स्वता:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तर केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजनेसाठी लाभार्थी वैयक्तिक स्वरुपाचा असावा, किमान 10 वी उर्त्तीण असावा. 21 वर्षापेक्षा जास्त वय असावे. अशा व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती भाडे तत्वावर घेतलेली शेतजमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्र चालक संस्था योजनेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे किंवा 10 वर्षासाठी भाडेतत्वावर किमान 1 एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे. 1 हजार चौरस फुट इमारत असावी. सदर योजनेचे प्रशिक्षण अर्ज करण्यासाठी मंडळाचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र भवन, कोटगल रोड, गडचिरोली येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी मुलकलवार मधुक्षेत्रिक मो. क्रं. 9422628050 यांच्याशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.